पांडुरंगा.... एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह
- by Reporter
- Jun 30, 2020
- 943 views
पंढरपूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच पंढरपुरात सात लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.
उद्या एकादशी असल्याने पंढरपुरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून पंढरपुरात संचारबंदी लागू होणार आहे. त्यानुसार शहरालगतचा १० किलोमीटरचा परिसर सील केला जाणार आहे.
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत. यंदा मी एक मुख्यमंत्री नव्हे तर तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तर पंढरपुरच्या मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल बढे यांना यंदा मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. मात्र, आता आदल्या दिवशीच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पंढरपुरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, वारकरी सेवा संघाने पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत १०० वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरात येण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. वारीतील महत्त्वाच्या परंपरेतील नगर प्रदक्षिणा, स्नान आणि गोपाळकाला सोबत पौर्णिमेपर्यंत मुक्कामास परवानगी मिळावी, अशीही या वारकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भातील याचिकेवर मे.मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी होणार आहे.

रिपोर्टर