मुलुंडच्या टोलनाक्यांजवळ पोलिसांची नाकाबंदी; विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २ किमी पेक्षा जास्त अंतर अत्यावश्यक कारणाशिवाय गेल्यास अश्या विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस आणि वाहतूक विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत शनिवारी व रविवारी मुलुंड, भांडूप मधील अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी सकाळपासून थेट मुलूंड पूर्व व पश्चिमेकडील टोल नाका तसेच ऐरोली जवळील टोल नाका अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर नाकाबंदी लावली असून या नाका-बंदीत विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना दंड आकारला जात आहे तसेच अश्या वाहनचालकांना यु-टर्न मारून परत पाठविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व टोलनाक्यांवर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. 

वाहतूक कोंडीबद्दल मुलुंड येथील वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता, लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश असल्याचे सांगण्यात आले असून मुंबईतील प्रवेशद्वारांवर मुलुंड पोलीस आणि वाहतूक विभागाच्या वतीने संयुक्तरित्या प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत वाहनचालकांना थांबवून चौकशी केली जात आहे. या तपासणी दरम्यान लावण्यात आलेल्या नाकाबंदीत मोठ्या संख्येने विनाकारण फिरणारे वाहन चालक आढळले असून या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना पुन्हा माघारी धाडण्यात येत आहे. या कारणास्तव सर्व टोलनाक्याजवळ  वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.


संबंधित पोस्ट