नेस्को मैदानावर उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये सहा कोटीचा घोटाळा, आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप
- by Reporter
- Jun 29, 2020
- 2130 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : नेस्को मैदानावरील ३३०० खाटांच्या कोविड उपचार केंद्राच्या उभारणीत अनेक घोटाळे झाले असल्याचे समोर येत असून या सेंटरसाठी ऑक्सिजन पुरवण्याचे कंत्राट चक्क एका बिल्डरला देण्यात आले असून ऑक्सिजनशिवाय आणखी दहा कोटीची कामेही याच बिल्डरला देण्यात आले असल्याचा आरोप भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी २६ जून रोजी वीडियो कान्फरेन्स द्वारा घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
नेस्कोच्या मैदानावर उभारलेल्या ३३०० खाटांच्या कोविड उपचार केंद्रातील ऑक्सिजनयुक्त खाटांसाठी लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम रोमवेल रिएल्टर्सला देण्यात आले असून या बिल्डरला ऑक्सिजन पुरवठय़ाचा कोणताही अनुभव नाही आहे. या ऑक्सिजनच्या कंत्राटाशिवाय १० कोटी ८० लाख रुपयांच्या इतर कामाची वर्कऑर्डर देखील या बिल्डरला देण्यात आली असून त्यापैकी ५ कोटी ५० लाख रूपये या बिल्डरला ऍडव्हान्स देण्यात आले. कोविड सेंटरचे काम देताना पॅनेलवरचे डेकोरेटर का घेण्यात आले नाहीत, असा सवाल आमदार मिहीर कोटेचा यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. बीकेसीतील २ हजारपैकी फक्त २०० खाटांचा उपयोग होत असून नेस्कोतील ३३०० पैकी फक्त ३०० खाटांचा उपयोग होत असल्याचा दावा यावेळी मिहीर कोटेचा यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेत मिहीर कोटेचा यांनी सांगितले की, बाजारात किरकोळ खरेदीत मिळणाऱ्या किंमतीपेक्षाही कितीतरी जादा दराने काही वस्तू खरेदी करण्यात येत असून, ज्याचा वैद्यकीय वस्तू पुरवठय़ाशी काहीही संबंध नाही, अश्या एका बिल्डरला हे काम देण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या कोविड सेंटरसाठी एक हजार खुर्च्या ९० दिवसांसाठी भाड्याने घेण्यात आल्या. यासाठी साडेचार लाख रूपये खर्च आला असता आणि याच खुर्च्या विकत घेतल्या असत्या तर अडीच ते साडेतीन लाख रूपये खर्च आला असता मात्र या खुर्च्यान्च्या भाड्यापोटी येथे ९ लाख रूपये खर्च करण्यात आले. लाकडाचे १५० टेबल सव्वा दोन लाख रुपयांत मिळाले असते त्यासाठी महापालिकेने ९० दिवसांसाठी पावणेसात लाख रूपये भाडे मोजले तर २ हजार उभ्या पंख्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये भाडे दिले जाणार आहे. हेच पंखे अमेझॉनवर ७० लाखांत विकत मिळाले असते असा आरोप मिहीर कोटेचा यांनी या पत्रकार परिषदेत केला.
दोन हजार प्लग पॉईंटचे ४५ हजार रूपये भाडे दिले जाणार असून हेच प्लग पॉईंट लेमिंटन रोडवरून अवघ्या ६ हजार रुपयांत मिळाले असते. कोविड सेंटर मध्ये ८० सीसीटीवी कॅमेरे आहेत. त्यातील प्रत्येक कॅमेऱ्यासाठी दिवसांला ८०० रूपये भाडे ठरलेले आहे त्यामुळे त्यापोटी ५७ लाख ६० हजार रूपये खर्च होणार आहे. हेच कॅमेरे चिनी बनावटीचे घेतले तर एक कॅमेरा एक हजार ते १५०० रुपयांना पडेल तर कोरियन बनावटीचा सर्वोत्तम कॅमेरा १० हजार रुपयांत मिळतो म्हणजेच अवघ्या ८ लाखांत ८० कॅमेरे विकत घेता आले असते. प्रति लिटर पाण्यामागेही बिल्डर २५ रुपयांचा भाव देण्यात आला आहे . एलईडी हॅलोजन सव्वापाच लाख रुपयांना विकत मिळाले असते पण भाड्यापोटी २४ लाखाहून अधिक रक्कम बिल्डरला देण्यात येणार आहे, असे आरोप मिहीर कोटेचा यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.
येथील खर्चाची आकडेवारी पाहिल्यास महापालिकेने रोमवेल रिएल्टर्सला दिलेल्या १० कोटी ८० लाख रुपयांच्या वर्कऑर्डरची खरी किंमत केवळ पावणे चार कोटी रूपये आहे. यात सहा ते सव्वा सहा कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून जर पुढील तीन महिन्यांसाठी हे कंत्राट वाढवून दिले तर तब्बल १२ कोटी रुपयांचा घोटाळा यात अपेक्षित आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेल्या घोटाळ्यासारखाच हा घोटाळा असून याबाबत राज्याचे मुख्य सचिव, महापालिका आयुक्त व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

रिपोर्टर