
धारावीतील कोविड योद्धे !
- by Reporter
- Jun 25, 2020
- 362 views
मुंबई (प्रतिनिधी) : धारावीचा कोरोनाने फास आवळताच सरकारचे, महापालिकेचे धाबे दणाणले. दहा बारा लाखाची लोक संख्या असलेल्या आणि चहू बाजूने झोपडपट्टीने वेढलेल्या धारावीला कोरोना पासुन वाचवणे म्हणजे तारेवरची कसरत.माजी महापालिका आयुक्त प्रविण परदेशीं यांनी धारावीला भेट दिली की नाही हे धारावीच्या लोकांना आठवत सुद्धा नसेल जणु काही त्यांनी धारावीला वाळीत टाकले होते. सतत टीव्ही वर वर्तमान पत्रातून धारावीला टार्गेट केले जायचे आणि बिल्डर लॉबीला आतून आनंदाच्या उकळ्या फुटायच्या.कारण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी जेवढी बदनाम होईल तेवढी त्याची किंमत कमी होईल.म्हणून तर धारावीतील लोक घरे सोडून गावी निघाल्याच्या अफवा विविध माध्यमातून पसरविल्या गेल्या. खरे तर जे लोक घर सोडून गेले ते उत्तर भारतीय आणि बिहारी लोक होते. ते धारावीत पोट भरण्यासाठी कारखान्यात काम करीत तसेच एकाच ठिकाणी पंधरा ते वीस लोक गाळा घेऊन भाडयानी राहात होते.लॉकडाऊन मध्ये हाताला काम नाही घर भाडे भरायचे कसे या विवेचनातून आपल्या गावी निघून गेले आणि ज्यांचे हक्काचे घर आहे ते मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविड योद्धाया सारखे धारावीत ठाण मांडून राहिले.
धारावीचा वाढता कोरोना प्रसार धारावीला गिळंकृत करतो की काय अशी अवस्था असताना धारावीचे तारणहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडफातडफी आयुक्त प्रविण परदेशीं याची उचलबांगडी करून धारावीला परिचयाचे असलेले आयुक्त इकबाल चहल यांच्या हवाली केले. पण शांत बसणार ते चहल कसले.मुबंई आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी सगळी धारावी पिंजून काडून त्यावर अभ्यास केला आणि तातडीने धारावीत महापालिकेच्या डॉक्टर बरोबर धारावीतील खाजगी डॉक्टरांची वेगवेगळी टिम बनवून झोपडपट्टीत घरोघरी जाऊन लोकांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली. आणि लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला.
धारावी सारख्या गजबजलेल्या वस्तीत कोरोनाचा संसर्ग प्रभावीपणे रोखण्यात यश आल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि धारावीतील लोकप्रतिनिधींचे कौतुक केले असले तरी यासाठी धारावीतील अनेक संस्था, मंडळ, ट्रस्ट हे सुद्धा कौतुकास पात्र आहेत.त्यांनी सुद्धा सातत्याने पाठपुरावा करून आपल्या वयक्तिक पातळीवर महापालिकेशी संपर्क साधून डॉक्टराची टिम बोलावून आरोग्य शिबीर भरवून अनेक लोकांची कोरोना चाचणी करून घेतली.अनेक संस्थांनी अन्न धान्य घरपोच केल्याने तसेच दुपार आणि संध्याकाळ या दोन वेळच्या जेवणाची पाकिटे समाजसेवका मार्फत घरपोच केल्याने लोक घरातच थांबून राहिले.समाजातील आपल्या लोंकासाठी धडपडणारे कोरोनापासून लोकांना वाचविणारे समाजसेवक हे सुद्धा कोविड योद्धे कौतुकास पात्र आहे.
म्हणूनच राज्यसरकार, महापालिका तसेच सरकारी डॉक्टर, खाजगी डॉक्टर यांना खऱ्या अर्थाने धारावीतील कोरोना संख्या कमी करण्यासाठी हातभार लावणारे लोकप्रतिनिधी, समाजसेवक, संस्था आणि संघटना आणि आपली हक्काची धारावी म्हणून घरीच बसून कोरोनाशी दोन हात करणारे धारावीतील कोविड योद्धे अभिनंदनास पात्र आहे. नाहीतर निवडणुका आल्या की धारावीसाठी चारशे फुटाची घराची मागणी करून आपले पोट भरणारे काही गल्ला भरू कार्यकर्ते कोविड योद्धा म्हणून मिरवण्यास तयार होतीलच कोरोना संपे पर्यंत त्यांच्या धारावीशी काही संबंध नसेल. कारण कोरोनाला घाबरून बायकोच्या पडदया आड लपणाऱ्याचे खरे रुप धारावीकरानी नक्कीच पाहिले असेल. धारावीतील जनता हेच आमचे कोविड योद्धे !
रिपोर्टर