वादळग्रस्त बांधवांना दिला साळी समाजाने मदतीचा हात

८० परिवारांच्या थेट बँक खात्यात केले आर्थिक साहय जमा

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : एकीकडे कोरोना विषाणूमुळे लॉकडॉउनच्या धर्तीखाली आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने आणखीच आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. रायगड जिल्हयातील सर्वच तालुक्यात मोठी वित्तहानी झाली. अनेकांचे होत्याचे नव्हते झाले, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले, घरांची छप्परे उडून गेली. त्यामुळे हतबल झालेल्या रायगड जिल्हयातील साळी समाज बांधवांच्या दुखात समाज बांधवच धावून आले असून रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजबांधवांनी मंडळाकडे दिलेल्या देणगीने नुकसानग्रस्त समाजबांधवांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करुन मदतीचा हात पुढे केला आहे.

    रायगड जिल्हयातील स्वकुळ साळी सेवा मंडळ हे आपल्या समाज बांधवांच्या सुख-दु:खात नेहमीच मदतीला धावले असून सातत्याने विविध उपक्रमाने आपल्या समाज बांधवांचा गौरव अथवा कौतुक सोहळा तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, कार्यक्रमांचे आयोजन व श्री जिव्हेश्वर जयंती सोहळा तसेच समाजाचे अधिवेशन असो अथवा समाज बांधवांच्या न्यायहक्कासाठी आंदोलन असो, किंवा सामाजिक बांधिलकी असो अशा विविधांगी माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी अग्रेसर राहिले आहे. टाळेबंदीमध्ये सुध्दा  गरीब गरजु समाज बांधवांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला असताना यथाशक्ती मदत केली होती.

    रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा, रोहा, गोरेगाव, बोर्लिपंचतन, दिवेआगर, चिंभावे, माणगाव, रानवली खरवली येथील साळी समाज बांधवांचे निसर्ग चक्रीवादळामध्ये मोठे नुकसान झाले. यामध्ये सर्वात जास्त रानवली व बोर्लिपंचतन येथील समाज बांधवांना फटका बसला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठे झाले. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथे समाजाच्या श्री गणेश मंदिर भक्तनिवास करिता दोन महिन्यापुर्वीच सुमारे सात लक्ष रुपये खर्च करून पत्रा शेड उभारण्यांत आली होती. ती देखील निसर्ग चक्रीवादळात पुर्णपणे जमिनदोस्त झाली. रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळाने भगवान जिव्हेश्वर जयंती उत्सव व निसर्ग चक्रीवादळ सहाय्यता निधी करिता समाजातील बांधवांना आवाहन केले होते. मंडळाकडे जमा झालेल्या रकमेतुन रायगड जिल्हयातील नुकसानग्रस्त ८० परिवारांना सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांची सहाय्यता निधी नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्यांत आल्याचे मंडळाचे अध्यक्ष अविनाश साळी यांनी कळविले तसेच या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजबांधवांनी दिलेल्या सहकार्यबद्दल समाजबांधवांना धन्यवाद दिले.

संबंधित पोस्ट