कोरोना बाधित रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी खासदार मनोज कोटक यांनी घेतली वरिष्ठ डॉक्टरांची बैठक

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची भेट घेवून कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड आणि रुग्णवाहिकाच्या उपलब्धते संबंधित आढावा बैठक घेतली. रुग्णांना बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत असल्याने ही बैठक घेण्यात आली. तसेच आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य जीवन योजना कोरोनाबाधित रुग्णांसाठी कार्यान्वित केली जावी यावर देखील या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत कोकण विभागाचे वरिष्ठ जिल्हा प्रमुख डॉ वैभव पवार, मुंबई जिल्हा समन्वयक डॉ धनंजय पाटील, ठाणे जिल्हा समन्वयक डॉ रविंद्र जगतकर, मुंबई कामगार रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते. 


सामान्य रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे फिरावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने तसेच रुग्णांना ने -आण करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका ऊपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी देखील वाढल्याने ही बैठक घेण्यात आली. तसेच खाजगी रुग्णालयात मनमानी पद्धतीने बिल आकारणी चालू असल्याने रुग्णांची नाहक लूट केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत यासाठी सरकारी योजनेचा उपयोग होवू शकतो का, या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवून त्यांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी संबंधित डॉक्टरांना खासदार मनोज कोटक यांनी केल्या. वरिष्ठ डॉक्टरांनी देखील पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

संबंधित पोस्ट