रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने 'एस वार्ड' टॉप टेन मध्ये


मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवईचा काही भाग अश्या स्लम, इमारती तसेच उंच आणि पॉश अश्या उच्चभ्रू वस्तीचा समावेश असलेल्या पालिकेच्या एस विभागाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने अल्प कालावधीतच एस वार्डाचा समावेश मुंबईतील अधिक कोरोना रुग्ण संख्या असलेल्या पहिल्या १० विभागात झाला असल्याचे दिसून आले आहे. गेल्या १० दिवसांत १००० नवीन कोरोना रुग्ण या विभागात आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ३५०० पर्यंत पोहचली असून सध्या मुंबईतील इतर वार्डातील रुग्ण संख्येच्या तुलनेत एस वार्ड आठव्या स्थानावर पोहचला आहे. स्लम वसाहतीसोबतच उच्च वर्गीय वस्ती असलेल्या पॉश इमारतीत देखील कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने येथे आढळून येत आहेत. 

मोठ्या प्रमाणात असलेली झोपडपट्टी त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचा वापर अधिक होत असल्याने कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी रस्त्यावर विनाकारण फिरणारे नागरिक, विशेषतः तरुण वर्ग, मार्केटमध्ये होणारी गर्दी, जागोजागी बसलेले भाजीपाला विक्रेते या सर्वांमुळे येथे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मार्च, एप्रिल मध्ये सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत प्रत्येक वस्तीत, परिसरात होणाऱ्या सॅनिटायझर फवारणीवर पालिकेने निर्बंध टाकल्यामुळे व पालिका देखील सार्वजनिक शौचालये असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सॅनिटायझर फवारणी करत नसल्यामुळे कोरोनाचा प्रभाव येथील स्लम परिसरात अधिक वाढल्याचे आढळून आले आहे. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत शेवटच्या १० मध्ये असलेला एस वार्ड जूनच्या तिसऱ्या आठवड्यात वरून आठव्या स्थानावर पोहचला. एक जूनला येथील कोरोना रुग्णसंख्या १७०५ होती ती वाढून आता ३५०० पर्यंत पोहचली म्हणजेच मागील १८ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पटीने वाढली असल्याचे चित्र समोर आले आहे. तसेच आतापर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या देखील बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. टक्केवारीमध्ये एस वार्डातील उपचार घेत असलेले रुग्ण ५९% असून हे प्रमाण इतर वार्डाच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले आहे. 

झोपडपट्टी आणि बैठ्या चाळी अधिक असलेल्या भांडूप, कांजूरमार्ग येथील फुले नगर, तानाजी वाडी, सोनापूर, टेंबीपाडा, गावदेवी, विक्रोळीतील आंबेडकर चौक आणि कन्नमवार नगर मधील काही परिसरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. तर पवईतील हिरानंदानी गार्डन परिसर या उच्चभ्रू वस्तीत देखील कोरोना रुग्ण अधिक आढळून आले आहे. येथे एकूण ७२ कॉंटेंटमेंट झोन असून १६७ सील इमारती असल्याचे समजले. 

'लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून सोशियल डिस्टेन्स राखले जात नाही आहे, पालिका कार्यालय देखील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात कमी पडत आहे, भाजीपाला मार्केटमध्ये विनाकारण अधिकची गर्दी होत आहे तसेच एस विभागातील अधिकचा भाग हा स्लम विभाग असल्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो, या सर्वांमुळे कोरोनाचा प्रसार येथे अधिक होत असून रुग्णसंख्या झपाट्याने एस वार्डात वाढत असल्याचे' येथील नगरसेविका सारिका पवार यांनी सांगितले. तर 'नागरिक विनाकारण बाहेर फिरत असून त्यांच्याकडून सहकार्याची व कॉंटेंटमेंट झोनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याची आवश्यकता आहे, तरच रुग्णसंख्या कमी होवू शकते', असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे येथील नेते आणि माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट