प्रवाश्यांची फलाटावर ये-जा चालू झाली तरीही मुलुंड स्थानकाच्या साफसफाईकडे स्टेशन अधिक्षकाचे दुर्लक्ष! राजकीय दणका मिळताच साफसफाईला सुरुवात

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर खाजगी कंपनीच्या कर्मचा-यांमुळे बसने प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होऊन अत्यावशक सेवेत काम करणा-या  कर्मचा-यांची गैरसोय होऊ लागली होती, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांसाठी लोकल चालू करावी ही मागणी लावून धरली. ह्या मागणीला यश येऊन सोमवार दि. १५ जून पासून अत्यावशक सेवा देणा-या कर्मचा-यांसाठी रेल्वे पुन्हा रुळावरून धावू लागली व त्यामुळे रेलवेने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे रेलवे फलाटावर पुन्हा ये-जा चालू झाले. रेलवे चालू झाली परंतु गेल्या ८५ दिवसांपासून प्रवाशांविना राहिलेल्या मुलुंड स्थानकात मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले होते. मुलुंड फलाटांची, स्वच्छतागृहांची साफसफाई होणे गरजेचे होते, परंतु मुलुंडच्या स्टेशन अधीक्षकांनी स्टेशनच्या स्वच्छतेकडे लक्षच न दिल्यामुळे स्थानकातील रेलवे फलाट, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी असलेली जागा, कॅन्टीन, बसायची आसने इत्यादीं अस्वच्छ तसेच धुळीने आणि घाणीने माखलेले आढळून आले. सर्वत्र धूळ व घाण पसरलेली होती. येथील स्वच्छतागृहे घाणीने भरलेले व अस्वच्छ आढळून आले, फलाटावरील बसण्याच्या जागेवर सर्वत्र धूळ व कचरा आढळून आला तर पाण्याचे नळ असलेली जागा देखील अस्वच्छ व धुळीने माखलेली दिसली. 

गेल्या ८५ दिवसांपासून प्रवाश्यांचे फलाटावर बिलकूल येणे जाणे नसल्यामुळे आणि फक्त स्थानकावरील मर्यादित पोलिस, आरपीएफचा स्टाफ इत्यादींचाच वावर तेथे रोज असल्यामुळे फलाट, स्वच्छतागृह, बसण्याच्या सीट साफच करण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे रेलवे चालू होताच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी,  प्रवासासाठी फलाटावर येताच त्यांना या अस्वच्छतेचा,  धुळीचा, घाणीचा सामना करावा लागला. त्यामुळे काही प्रवाश्यांनी यासंबंधीची तक्रार मुलुंड स्थानकाचे स्टेशन अधिक्षक एस डी बर्नवाल यांच्याकडे केली परंतु बर्नवाल यांनी फलाट साफसफाईसाठी सुरुवातीचे ४ दिवस काहीच पावले न उचलल्याने अखेर प्रवाशांनी मुलुंडमधील शिवसेना पक्षाच्या कार्यालयात जावून यासंबंधीची तक्रार केली. या तक्रारीला अनुसरून स्थानिक शाखाप्रमुखांनी मुलुंड स्टेशन अधिक्षक बर्नवाल यांना रीतसर लेखी तक्रार देवून सर्व फलाट, स्वच्छतागृह, बाकडे, इत्यादींची तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली. 

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लेखी तक्रारी मिळताच स्टेशन अधीक्षकांनी हालचाल करायला सुरुवात केली व स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलावून फलाट, स्वच्छतागृहे व इतर सर्व जागा ताबडतोब साफ करण्याचे आदेश दिले. मुलुंड मधील सर्व फलाटांवर साफसफाईला सुरुवात झाल्याबद्द्ल प्रवाश्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. परंतु राजकीय दणका पडण्याअगोदर एवढे दिवस मुलुंडचे स्टेशन अधिक्षक झोपले होते का ? रोजच्यारोज स्टेशन फलाट व स्वच्छतागृहांची का साफसफाई होत नव्हती असे प्रश्न काही प्रवाश्यांनी यानिमित्ताने विचारले आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट