
पाऊले चालेनात पंढरीची वाट.
- by Adarsh Maharashtra
- Jun 21, 2020
- 1415 views
मुंबई(भारत कवितके) महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करून यावर्षी आषाढी वारी निमित्त होणारी पायी वारी अर्थात पालखी सोहळा कोरोनाच्या संकटामुळे होऊ शकला नाही.याची प्रत्येक वारकर्याच्या मनात खंत आहे, पण दोष द्यायचा तरी कुणाला ? या विचाराने वारकरी सांप्रदाय आपले दुखी,कष्टी मन , विठूच्या दर्शनाला आसुसलेले डोळे लाऊन आप आपल्या घरीच आहेत.आषाढी वारी पालखी सोहळा हा कुणाच्याही आमंत्रणा शिवाय होतो,महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणात पायी वारीत सामील होत असतो.सोशल डिस्टन्सच्या नियमाचा भंग होऊन जगभर पसरलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यावर्षी पालखी सोहळा शासन व वारकरी यांच्या संगनमताने रद्द करण्यात आला आहे.पंढरीतील नगरपालीका,पोलीस यंत्रणा,राज्य परिवहन मंडळ,मंदिर कमिटी व्यापारी वर्ग,निवासी जागेचे मालक,सगळे कसे अगदी आतुरतेने पायी वारीची वाट पहात असतात.वारकर्यांना मार्गदर्शन,त्यांची देखभाल करण्यासाठी प्रयत्नशील असतात पण यावर्षी उलट झाले आहे.पंढरीत या काळात कुणालाही प्रवेश देण्यात येऊ नये.गावातील मठ,धर्मशाळा,लाँज,व इतर निवासी जागेत जर कोणी आढळले तर त्यांचेवर व निवासी जागेच्या मालकांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल असा शासनाने आदेश काढल्याने पंढरपूरा तील निवासी मालकांचे धाबे दणाणले आहेत.पंढरीतील रस्त्यावर पोलीसाचा चोख बंदोबस्त लाऊन पंढरीत कोणालाही येऊ दिले जाणार नाही.असे शासकिय आदेश दिले गेले आहेत.दशमीला पादुका पंढरीत आणल्या जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.यामुळे यावर्षी पालखी सोहळा होणार नाही,व पाऊले पंढरीची वाट चालणार नाहीत.तरीही मी तुम्हाला शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करून माझ्या या लेखातून पंढरीला पालखी सोहळ्या साठी घेऊन जाऊ शकतो.चला तर मग .......विठोबा रूक्माई,....माऊली माऊली.....
दक्षिण काशी समजले जाणारे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर हे तिर्थ क्षेत्र भीमानदीच्या तीरावर वसलेले आहे.सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे गाव.आसपास प्रचंड खेडी,जवळ जवळ 54 खेडी वाड्या आहेत.असे जाणकार सांगतात.या गावाला कुणी वैकुंठ भुमी तर कुणी संताचे माहेर घर म्हणतात.येथे वर्षातून चार मोठ्या यात्रा भरतात.प्रत्येक एकादशीला पंढरपूरात काही नियमाचे वारकरी नियमितपणे पाडुरंगाच्या दर्शनाला दाखल होतात.शिवाय इतर वेळी गर्दीपासून अलिप्त राहून पंढरपूरात फिरायला येणारे पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात.
तुकोबा,माऊली,चोखोबा हे संत वारकरी पंथाचे प्रवर्तक असल्याचे मानले जाते,जवळ जवळ सातशे वर्षापासून दिंड्या पताका तुळस घेऊन टाळ मुदुंग वाजवित अभंग भारूड,गौळण गात पंढरीची वारी करतात.आषाढी वारीत वारकरी आपले सुख दुख विसरून,ऊन,वारा,पाऊन,थंडी याची तमा न बाळगता पायी वारीत सामील होतात.
साधारणपणे 60 ते 70 हजार वारकरी वेगवेगळ्या संताच्या पालख्यांबरोबर पंढरीकडे धाव घेतात.सुमारे 70 ते 75 पालख्या पंढरीची वाट चालत असतात यापैकी आळंदी वरून माऊलीची तर देहूवरून तुकोबाची पालखी .या दोन पालख्या सर्वात मोठ्या असतात.पुणे येथील हडपसर पर्यत एकत्र आलेल्या या दोन पालख्या आपआपला मार्ग बदलतात तुकोबाची पालखी सोलापूर रोडकडे जाते व माऊलीची पालखी दिवेघाटमार्गे सासवड कडे जाते.या दोन्ही पालख्याचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी पुढे वाखरी येथे या दोन्ही पालख्या एकत्र होतात.माऊलीची पालखी पुणेनंतर हडपसर सासवड,व जेजुरी निरा,लोणंद,तरडगाव,फलटण,बरड,धर्मपुरी,नातेपुते,मांडवे,सदाशिवनगर,माळशिरस,वेळापूर ,तोंडले,बोंडले,भंडीशेगाव वाखरी येथे येते.पालखी मार्गातील प्रत्येक गावात पालखीचे भक्तीभावाने स्वागत केले जाते.खारीक खोबरे प्रसाद म्हणून वाटले जाते.दिंडीतील वारकर्याना गावातील घरोघरी जेवन दिले जाते.अनेक ठिकाणी फऴे मिठाई व इतर वस्तूंचे वाटप केले जाते.तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू गावात उभारले जातात वारकर्याची जास्ती जास्त चांगली सोय होण्यासाठी पालखी मार्गातील प्रत्येक गाव प्रयत्नशील असते.पंढरपूर जवळील वाखरी (बाजीरावची विहीर ) या ठिकाणी जो गोल रिंगण सोहळा होतो तो डोळ्याचे पारणे फेडतो.पालख्या सोबत फिरते मोफत दवाखाने पिण्याच्या पाण्याचे टँकरस् ,चहा नाष्ट्याची फिरती दुकाने,फुगे पावा,रंगी बेरंगी खेळणी विकणारे,कोंदण काढणारे,हे सामील असतात.डोंबारी,गारोडी,जादूगार आपले खेळ करून पैसे कमवितात.जसे जसे पंढरपूर जवळ येईल तसेतसे सर्वांमध्ये एक वेगळे सळसळते चैतन्य येते.पालख्याचा भव्य दिव्य अशा झगमगाटात पंढरीत प्रवेश होतो.यावेळी प्रत्येक वारकरी नवचैतन्याने भारावून जातो,पालख्या पंढरीत आल्यावर सर्व वारकरी पंढरीत विखुरले जातात नदीतील स्नान,पांडुरंगाचे दर्शन,व प्रदक्षिणा आदि कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने केले जातात.पंढरीतील भिमानदीला पंढरपूर शहरी चंद्रासारखा आकार प्राप्त झाल्याने या ठिकाणी चंद्रभागा असे ही संबोधले जाते.चंद्रभागेत स्नान केल्याने मानव पापमुक्त होतो.असे मानले जाते.प्रदक्षणा घालताना समोर भेटलेल्या वारकर्यास प्रेमाने अलिंगण देऊन जणू प्रत्यक्षातपांडुरंग भेटला ही भक्तीमय भावना मनात ठेऊन त्याच्या पायावर आपले मस्तक ठेवतो.मग तो लहान असो वा मोठा असो.प्रत्येक वारकरी टाळ मुदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन जातो. स्त्रीया डोक्यावर तुळस घेऊन पारंपारिक ओव्या अभंग म्हणतात पंढरपूरातील कैकाडी महाराज,तनपुरे महाराज,गाडगे महाराज यांचे मठ पाहण्यासारखे आहेत
गोपाळपूर येथील गोपाळकाला म्हणजे या यात्रेचा समारोप होय.दही व लाह्या वारकरी एकमेकास भरवतात,प्रसाद म्हणून वाटतात आषाढी वारी संपल्यावर दिंडीतील वारकरी आप आपल्या गावाकडील घराकडे धाव घेतात,समाधानी होऊन.सर्वांनी आता पालखी सोहळ्याचा आस्वाद घेतला असेलच मनातल्या मनात पालखी सोहळा अनुभवला असेलच पांडुरंगाचे दर्शन घेऊन समाधानी ही झाला असेलच व पुन्हा आपआपल्या गावाकडे ही धाव घेतली असेलच.
विठोबा रूक्माई....माऊली माऊली......
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम