मुंबई महापालिका मुंबईतील रुग्णालयांना पुरवणार २ लाख ८ हजार लीटर ऑक्सिजन

मुंबई :कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा कायम ठेवून कोरोना बाधित रुग्णांना सातत्याने ऑक्सिजन पुरवावा लागतो. परिणामी,  ऑक्सिजन पुरवठ्याची अधिक गरज भासू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका आता विविध रुग्णालये व कोरोना उपचार केंद्र मिळून २० ठिकाणी २ लाख ८ हजार लीटर ऑक्सिजन पुरवणार आहे. 

मोठी रुग्णालये व भव्य कोरोना उपचार केंद्र (जम्बो फॅसिलिटी) मिळून १४ ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम आता टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.


ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यासाठी १३ हजार किलोलीटर व ६ हजार किलोलीटर अशा दोन प्रकारातील अवाढव्य ऑक्सिजन टाक्या १४ ठिकाणी लावण्याचे निश्चित करण्यात आले. तर इतर ६ रुग्णालयांमध्ये १ हजार लीटर क्षमतेच्या टाक्या लावण्याचे ठरवण्यात आले. वरळी एनएससीआय डोम येथे १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी, महालक्ष्मी रेसकोर्स येथे १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी, दहिसर टोल नाका येथे १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ , दहिसर बस आगार १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ , मुलुंड येथील रिचर्डसन क्रूडास येथे १३ हजार किलोलीटर क्षमतेच्या २ टाक्या, गोरेगाव नेस्को येथे १३ हजार किलोलीटर क्षमतेच्या २ टाक्या, वांद्रे –कुर्ला संकुल (भाग १) येथे १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी, वांद्रे-कुर्ला संकुल (भाग २) येथे १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी त्याचबरोबर शीव (सायन) येथील महानगरपालिका रुग्णालयात ६ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी, कस्तुरबा रुग्णालयात  ६ हजार किलोलीटरची १ टाकी, नायर रुग्णालयात १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी आणि ६ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी, केईएम रुग्णालय १३ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी, घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ६ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी तर कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय येथे ६ हजार किलोलीटर क्षमतेची १ टाकी असा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.


संबंधित पोस्ट