
टाटा कॉलनीतील रस्ते साफसफाई कडे पालिकेचे दुर्लक्ष, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी
- by Reporter
- Jun 19, 2020
- 818 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील रस्ते लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसांपासून म्हणजेच गेल्या ८५ दिवसांपासून पूर्णपणे साफ होत नसून रस्त्यावर सर्वत्र कुत्र्याच्या विष्ठा, झाडांचा कचरा व इतर कचरा पडलेला आढळून येत असून येथील पालिकेचे सफाई कामगार येवून बसतात परंतु साफसफाईचे काम मात्र अपूर्ण ठेवून जातात. अर्धवट रस्ता साफ करतात व अर्धा रस्ता दुसऱ्या दिवशी येवून करतात तेही पूर्णपणे स्वच्छ नाही तसेच येथील छोटे रस्ते आठवड्यातून एकदाच साफ केले जात आहेत, अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत व याप्रश्नी हे नागरिक लवकरच पालिकेच्या टी वार्डच्या सहाय्यक आयुक्तांना भेटून रीतसर तक्रार करणार असल्याचे समजते .
या रस्त्यावर फेरफटका मारला असता रस्त्यावर अस्वच्छता दिसत असून ठिकठिकाणी कुत्र्याच्या विष्ठा रस्त्यावर तश्याच पडलेल्या व त्या साफ न केल्याचे दिसून आले. या विष्ठावर माश्या बसून सर्वत्र रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहने या विष्ठावरून गेल्याने सर्वत्र घाण झाल्याची दिसून आली. तसेच झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला असल्याने सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.
दरम्यान लॉकडाऊन व प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत हे बहाने पुढे करुन गेल्या ८५ दिवसांपासून टाटा कॉलनीतील रस्ते स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कर्मचारी व पालिका अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असून येथील साफसफाई कर्मचारी हे सर्व मुलुंडमध्येच राहणारे आहेत व हे सर्वजण दिवसा कामाला येतातथोडा रस्ता साफ करतात व बाकीचा वेळ येथील ओएनजीसीच्या ओसाड जागी टाइमपास करत बसलेले असतात व १० वाजले की निघून जातात. महेंद्र पाटील हे पालिकेचे अधिकारी यांच्यावर आहेत परंतु ते लक्षच देत नसून साईट विजिटला कामाची पाहणी करण्यासाठी कधीच येत नाही तसेच हे अधिकारीच या सफाई कामगारांना पाठिशी घालतात त्यामुळे येथील रस्ते नेहमीच अस्वच्छ असतात, असे टाटा कॉलनीतील एका जागरूक नागरिकांने यासंदर्भात सदर प्रतिनिधीकडे सांगितले.
येथील पालिकेचे स्वच्छता अधिकारी महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनामुळे मनुष्यबळ कमी असल्यामुळे साफसफाई पूर्णपणे होत नाही आहे. प्रवासाची साधने उपलब्ध नसल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मनुष्यबळ वाढले की नियमित साफसफाई केली जाईल, असे सांगितले.
कोरोनाच्या काळात स्वच्छतेला विशेष महत्व असतानाही तसेच पावसात रोगराई अधिक पसरते असे असूनही पालिका अधिकारी व सफाई कामगार रस्ते साफसफाईच्या बाबतीत बेफिकीर असल्याचे यावरून दिसत असून संबंधित पालिका अधिकारी व सफाई कामगारांवर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने होताना दिसत आहे.
रिपोर्टर