परंपरा खंडित होऊ न देता यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा,मुख्यमंत्र्यांचे सार्वजनिक मंडळांना आवाहन
- by Reporter
- Jun 19, 2020
- 1198 views
मुंबई (प्रतिनिधी): परंपरा खंडित न होऊ देता यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला.झूम अँपद्वारे आगामी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सूचना अडचणी जाणून घेतल्या.
कोरोनाच्या संकटात आपल्या सर्व गणेशभक्तांची साथ महत्त्वाची असून साऱ्या जगाचे लक्ष वेधले जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे सण साजरे करायचे आहेत. त्यासाठी शासनातर्फे लवकरच नियमावली जाहीर केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यापूर्वी डेंग्यू-मलेरिया सारख्या साथीच्या आजारावर जनजागृती केली होती. त्याचप्रमाणें आता कोरोनाच्या लढाईत गणेशभक्त चांगली साथ देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले. शिर्डीचे साईबाबा संस्थान ,सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनाने गर्दी टाळण्यासाठी मंदिरेच बंद ठेवली नाहीत तर कोरोनाच्या लढाईत मदतही केली असे सांगत अनेक गणेशोत्सव मंडळांनी देखील सामाजिक भान ठेवून मदतकार्य करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आभार व्यक्त केले. आपण अंधभक्त नसून डोळसपणे समाजात जनजागृती करणारे मंडळी आहात असे सांगत यापूर्वीच आपण सर्वांनी उत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंडळाचे आभार व्यक्त केले. लॉक डाऊननंतर पुनश्च हरिओम म्हणत आपण हळू हळू सर्व व्यवहार पूर्वपदावर आणत आहोत.मात्र उत्सवासाठी होणारी गर्दी टाळली पाहिजे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तर आषाढी एकादशीनिमित्त यावर्षी विठ्ठल- रुक्माईचे दर्शन ऑनलाइन होणार असल्याने गणेशोत्सव मंडळाने देखील ही मोहीम राबवावी असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गणेशभक्त समाजात जनजागृती करत असल्याने ते खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे असल्याचं प्रशंसोद्गार पवार यांनी यावेळी व्यक्त केले. शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करत आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे असे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले. या चर्चासत्रात मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, सतेज पाटील,शिवसेना खासदार- पक्ष सचिव अनिल देसाई, शिवसेना नेते-माजी मंत्री लीलाधर डाके, आमदार अजय चौधरी, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गणेशोत्सव समितीचे दहिबावकर, जयेंद्र साळगावकर,विविध विभागांचे सचिवासहित राज्यभरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला समर्थन देत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.
रिपोर्टर