पवईच्या एका बँक कर्मचाऱ्याची ऑनलाईन मद्य खरेदी व्यवहारात सायबर भामटय़ांनी केली फसवणूक

मुलुंड(शेखर चंद्रकांत भोसले): कॅशलेस व्यवहार करण्यावर शासन भर देत असले तरी कॅशलेस व्यवहारामुळे अनेकांना फटका बसत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने घडत असताना सुशिक्षित लोकं देखील या फसवणुकीला बळी पडत असल्याचे आढळून येत आहे. पवईला नुकतीच अशी एक फसवणुकीची घटना घडली असून त्यात सायबर भामट्यांनी पवईच्या बँक कर्मचाऱ्याला तब्बल ८२५०० रुपयांचा गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. पवई नजीकच्या चांदिवली परिसरातील रहेजा विहार या इमारतीत राहणाऱ्या एका ३४ वर्षीय बँक कर्मचाऱ्याला ४५०० रुपयांच्या ऑनलाईन मद्य खरेदीच्या व्यवहारात क्रेडिट कार्डचा तपशील देणे महाग पडले असून हा तपशील दिल्याने या युवकाला ८२५०० रुपयांचा फटका बसला आहे. त्यासंबंधीची तक्रार या युवकाने पवई पोलिसांकडे केली आहे. 

सरकारने लॉकडाऊनच्या काळात मद्यप्रेमींसाठी नजीकच्या मद्य विक्री दुकानाद्वारे घरपोच मद्य विक्रीला परवानगी दिल्याने, पवईतील रहेजा विहार येथे राहणाऱ्या हा युवक मद्य खरेदीसाठी नजीकच्या मद्य विक्रीच्या दुकानाचा फोन नंबर फेसबुक पेज वर शोधत असता तेथे त्याला किंग वाईन शॉपचा तपशील नजरेत आला. तेथे दिलेल्या फोन नंबरवर त्याने फोन केला असता फोन वरील व्यक्तीकडे ४५०० रुपयांच्या मद्याची ऑर्डर नोंदवली. यावर या भामटय़ाने ऑनलाईन पेमेंट करा असे सांगून त्याच्या क्रेडिट कार्डचा तपशील आणि नंतर मोबाईल वर आलेला ओटीपी द्यायला सांगितले. तसे केले असता क्षणात दोन व्यवहारातून प्रत्येकी ६१००० रूपये काढण्यात आल्याचा मेसेज या युवकाच्या मोबाईलवर आला. तात्काळ या युवकाने बँकेत फोन करुन कार्ड ब्लॉक करुन घेतले त्यामुळे ३९५०० रूपये तो वाचवू शकला.

तरुणांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून बँकेकडून या युवकाच्या बँक खात्याचा तपशील मागून घेतला असून इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) अड्रेस पोलिस चेक करत आहेत.

सावधगिरी बाळगायला हवी

सर्च इंजिनवर मिळालेला नंबर हा खरा आहे का तो तपासले पाहिजे. सायबर भामटे हे सर्च इंजिनमध्ये फेरफार करतात. खऱया नंबर ऐवजी दुसरा नंबर देतात. फसवणूक केल्यावर भामटे हे फोन बंद करतात. बनावट कागदपत्रांच्या मदतीने भामटे हे सिम कार्ड घेतात. त्यामुळे अशा भामटय़ाचा शोध घेणे कठीण असते.

- सर्च इंजिनवर मिळालेला नंबर तपासणे आवश्यक 

- ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही  शेयर करु नये

संबंधित पोस्ट