मुंबई महानगर पालिकेच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राचे कर्मचारी ३ महिन्यांपासून पगारापासून वंचित

मुलुंड (प्रतिनिधी ): मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांपुढे खायचे काय, कुटुंबाला कसे पोसायचे, घर कसे चालवायचे हा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला असुन या सर्व कर्मचाऱ्यांवर पगार न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कर्मचारी मध्यमवर्गीय असल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड कार्यालयात असलेल्या नागरी सुविधा केंद्रात पालिकेच्या कार्यालयात येणाऱ्या जनतेला जन्म-मृत्यू दाखला देणे, विवाह नोंदणी करणे, बिल पेमेंट करणे, उद्योगाचा दाखला, आरोग्य दाखला, या व अश्या अनेक सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून पालिकेने 'अलंकित लिमिटेड' या कंत्राटदार कंपनीला हे नागरी सुविधा केंद्र चालविण्यात दिले असून या कंत्राटदाराने नियुक्त केलेले कर्मचारी पालिकेच्या वार्ड कार्यालयात असलेल्या नागरी सुविधा केंद्रात येणाऱ्या जनतेची आवश्यक कामे करुन देत आहेत. परंतु येथील सर्व कर्मचाऱ्यांना मार्च २०२० पासून पगार देण्यात आला नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मार्च महिन्यांपासून टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीच्या काळात जाण्या, येण्याच्या सुविधा नसतानाही मार्च महिन्यांपासून संपूर्ण दिवस भरूनही पगारापासून येथील कर्मचारी उपेक्षित आहेत. मुंबई महानगर 
पालिकेशी केलेल्या करारानुसार कंत्राटदार  
'अलंकित लिमिटेड'ला कोणतीही आणीबाणीची परिस्थिती असेल तरीही नागरी सुविधा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणे बंधनकारक असूनही मार्च महिन्याचा अर्धा पगार मे महिन्यांत देण्यात आला तर एप्रिल व मे महिन्याचा पगार अद्याप देण्यात आला नाही आहे. टाळेबंदीमध्ये काम करूनही पगार देण्यात न आल्यामुळे येथील कर्मचारी संतप्त झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घर कसे चालवायचे, कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, मुलांची शाळेची फी कशी भरायची, घर भाडे कुठून द्यायचे अश्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत नसल्याने हे सर्व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.  

कंत्राटदार 'अलंकित लिमिटेड' परिस्थितीचा फायदा घेत असून पगार द्यायला टाळाटाळ करत आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कंत्राटदाराच्या जाचक अटी, कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येत असलेल्या सोईसुविधांचा अभाव, अपुरा पगार यामुळे त्रस्त असलेल्या नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कामगार नेते बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संजय वाघ यांच्या नेतृत्वाखालील म्युनसिपल कामगार सेनेच्या युनियनचे सदस्यत्व स्वीकारून युनियनमार्फत देखील आपल्या मागण्या कंत्राटदाराकडे सातत्याने लावून धरत आहेत व दाद मागत आहेत. 

कंत्राटदार अलंकित लिमिटेड कर्मचाऱ्यांना वेळेवर व संपूर्ण पगार न देता फुकटचे राबवून घेत आहे व ताळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अतिरिक्त फायदा घेत सर्व कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी ह्यात लक्ष घालून कर्मचाऱ्यांना वेळेवर पूर्ण वेतन मिळून देण्यास सहकार्य करावे अशी मागणी नागरी सुविधा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट