स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रोजगार संधीसमवेत त्यांना योग्य प्रशिक्षण ही देण्याचे निर्देश
- by Adarsh Maharashtra
- Jun 10, 2020
- 1545 views
मुंबई, दि. १०: राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका. भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, संजय बनसोड, मुख्य अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले. आता मुंबई महानगर परीसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहीराती द्या. खासकरून जेथे जेथे मेट्रोचे कामं सुरू आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जाहीराती द्या. त्यामुळे राज्यातील भुमीपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या समनव्यातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकास कामे करतांना त्याचा प्राधान्यक्रम ठरवा असेही त्यांनी सांगितले. पावसाळा सुरू होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी सुरू असलेली विकास कामे बंद आहेत. अशा वेळी प्रमुख शहरांमध्ये कुठलीही अडचण, पुरस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तातडीने डेब्रीज उचलणे, ड्रेनेज पाईप दुरुस्ती करणे आदी कामांवर लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, नाशिक मेट्रोबाबत सादरीकरण करण्यात आले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम