उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे सहा महिने पूर्ण

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारला सहा महिने पूर्ण झाले असून लवकरच हे सरकार २०० दिवस पूर्ण करणार आहे. राज्यातील हे सरकार स्थापन करण्यासाठी भिन्न विचारधारेचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र आले. विरोधकांकडून तीन चाकांचं हे सरकार लवकरच घसरणार अशी टीका केली गेली. पण महाविकास सरकारने ६ महिने पूर्ण करुन विरोधककांना तोंडावर पाडले आहे. चलाख विरोधी पक्षाच्या नेत्यांना तोंडघशी पाडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना   विधानपरिषदेवर निवडून आणणे, हे महत्वाचे कार्य या सहा महिन्यांत या सरकारने केले असून पुढील कारभार हाकणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना आता शक्य झाले आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉमन मिनिमम प्रोग्रामपेक्षा कोरोनाला रोखण्यासाठी पाऊले उचलणे, ही प्राथमिकता सध्या या सरकारची असणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने कार्ये करीत आहेत. कोरोनाला रोखणे व राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देवून विकासाला प्राधान्य देणे, ही दोन मुख्य कामे या सरकारला प्राथमिक स्वरूपात करायची आहेत. पहिल्या सहा महिन्यांत त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. कोरोना, निसर्ग वादळ, विरोधी पक्षाचे राजकारण या सर्वांचा सामना त्यांना करावा लागला आहे. 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार कडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य प्रकारें काम करीत आहेत. सव्वा दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता 'मिशन बिगिन अगेन' द्वारा अनलॉकचा पहिला टप्पा चालू केला आहे व हे सर्व करताना, प्रत्येक वेळी सुसंवाद साधून जनतेला कल्पना देण्यात येत आहे. तुम्ही काळजी घ्या, सरकार खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभी आहे असे वारंवार सांगून जनतेला या कठीण काळात धीर देण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत परिणामी राज्यातील जनतेला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरें आपले वाटू लागले असून त्यांच्यावरील व सरकारवरील विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्यामुळेच देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्या पाचात आहेत.

मागील ३ महिन्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना वायरस संदर्भात राज्यातील जनतेशी ज्या उत्तम प्रकारे संवाद साधला व जनतेला धीर दिला, तसेच सरकार सर्व जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे हे वारंवार सांगून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला त्यामुळे राज्यातील जनतेचा त्यांच्या मुख्यमंत्र्यांवरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे. याचा उलटा परिणाम विरोधी पक्षात झाला असून बेचैन विरोधी पक्ष नेते उलट सुलट विधाने करुन स्वतःतील नैराश्य लपवू शकत नाही आहेत. उद्धव ठाकरेंची वाढती लोकप्रियता सहन होत नसल्याने विरोधक वाटेल तशी विधाने करुन स्वतःचेच हसे करुन घेत आहेत. या महामारीच्या काळात राजकारण न करता सरकारला साथ देणे गरजेचे असतानाही ऊठसूट राज्यपालांकडे जावून सरकारविरोधात तक्रारी करत आहेत. महाराष्ट्रातील जनता देखील विरोधकांचा हा बालिश खेळ बघून हैराण झाली आहे व त्यामुळेच राज्यातील जनता संयमी व परिपक्व नेतृत्व असलेले, जनतेची काळजी घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभी राहताना दिसत आहे.  

ठाकरे सरकारचे सौभाग्यदेखील मोठे आहेत कारण जाणता राजा शरद पवार यांचा दीर्घ अनुभव व कांग्रेस आणि राष्ट्रवादी मधील अनेक अनुभवी व राजकीय दृष्ट्या परिपक्व नेते या सरकारमध्ये सहभागी आहेत त्यामुळे प्रशासनाची घडी उत्तम बसली असून राज्याचा कारभार यापुढेही उत्तमरित्या हाकला जाणार किंबहूना गेल्या सहा महिन्यांतील राज्याचा कारभार बघितला आणि त्याचे विश्लेषण केले तर राजकीय विश्लेषक देखील या सरकारच्या कारभारा बद्दल चांगलेच बोलत असल्याचे दिसून येत आहे. राजभवनातील राज्यपालांची पॉवर आणि विरोधकांचे डावपेच यासर्वांपासून सरकारला वाचवत राज्यातील जनतेच्या मनात सरकारबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण करण्यात हे महाविकास आघाडीचे सरकार यशस्वी झाले असून कोरोनाची लढा देत यापुढे अधिक चांगली कार्ये या सरकार कडून नक्कीच होतील व हे प्रगत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुशल नेतृत्वाखाली अधिक प्रगत होवून सूजलाम सुफलाम महाराष्ट्र सर्व जगात आदर्श राज्य होईल असा मजबूत आत्मविश्वास राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. 

उद्धव ठाकरे हे सरकार  विधीमंडळाच्या कामकाजासाठी नवीन होते. सरकार चालविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली परंतु त्यांनी न डगमगता जनतेची योग्यरित्या काळजी घेत आघाडीचे सरकार उत्तमरीत्या सांभाळत आपणही एक चांगले प्रशासक असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले अनुभवी मंत्री तसेच शिवसेना, एनसीपी आणि कांग्रेसचे अनुभवी विधिमंडळ सदस्य या सर्वांना सोबत घेवून उद्धव ठाकरे सक्षमपणे हे राज्य चालवित आहेत. या संपूर्ण अनुभवातून उद्धव ठाकरे एक चांगले मुख्यमंत्री आणि टीम लीडर म्हणून समोर आले आहेत. त्यांची काम करण्याची सकारात्मक कार्यशैली आणि इतर मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत, मंत्रिमंडळ सदस्यांसोबत नियमितपणे सल्लामसलत करण्याची कला यामुळे ते लोकप्रिय झाले असून त्यांच्या हातून उत्तमरित्या राज्याचा कारभार चालला आहे, असे राजकीय जाणकारांचे मत झाले आहे. सहा महिन्यांत हे सरकार पडेल अशी बोंब मारणाऱ्या विरोधकांना हे सरकार पूर्ण ५ वर्षे कारभार करणार ही बाब समजली आहे आणि त्यामुळे सैरभैर झालेले विरोधक राजकारण करुन, राज्यपालांच्या साथीने या महाआघाडी सरकारला विनाकारण त्रास देत आहे. परंतु आपली काळजी घेणारे, सर्वांना सोबत घेवून जाणारे, राज्याचा कारभार उत्तम प्रकारे हाकणारे, संयमी परंतु कणखर नेतृत्व गुण असलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राला आर्थिक प्रगतीकडे व विकासाकडे घेवून जातील व येणाऱ्या सर्व नैसर्गिक आणि राजकीय संकटांना उत्तम प्रकारे हाताळतील, हे गेल्या सहा महिन्यांतील कारभारावरून राज्यातील जनतेला देखील समजून चुकले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट