मुंबईत होत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या देशात सर्वाधिक

महानगरपालिकेकडून दिली जाणारी विविध स्वरूपाची आकडेवारी व माहिती वस्तुस्थितीदर्शकच

मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याचे तसेच चाचणी, बाधित रुग्ण तसेच मृत रुग्ण या संदर्भात कमी-अधिक आकडेवारी दिली जात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसारित आहे. मात्र ते वस्तुस्थितीशी विसंगत असून त्याबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दररोज सरासरी ४ हजार चाचण्या केल्या जातात. ही सरासरी कायम आहे. ती कमी झालेली नाही. दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली तर दिनांक ११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. दिनांक ३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर १ जून २०२० रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. याचाच अर्थ दिनांक ६ मे ते १ जून या अवघ्या २५ दिवसांमध्ये दररोज सरासरी ४ हजार या दराने १ लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आय.सी.एम.आर.) ही देशपातळीवरील संस्था असून चाचण्यांचे निकष याच संस्थेमार्फत ठरवले जातात. त्यानुसारच मुंबईतही चाचण्या होतात. या संस्थेने वेळोवेळी निश्चित करून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महानगरपालिकेच्या वतीने कोरोना चाचण्या केल्या जातात. दिनांक १८ मे २०२० रोजी परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच सध्या चाचण्या होत आहेत. पूर्वी कोरोना बाधित रुग्णाच्या २ चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यास घरी सोडले जात असे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार आता फक्त १ चाचणी निगेटिव्ह आली तरी घरी सोडण्याची मुभा आहे. तसेच क्ष-किरण तपासणीमध्ये सुधारणा, ऑक्सिजन पातळीमध्ये सुधारणा असे सकारात्मक बदल दिसून आले तर योग्य वैद्यकीय परीक्षण आधारेदेखील चाचणी न करता रुग्णास घरी पाठवून विलगीकरण करता येते. प्रसूतीसाठी येणाऱया गर्भवती महिलांची पूर्वी सक्तीने चाचणी करण्यात येत असे. आता तशी आवश्यकता नाही. यासारख्या विविध सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमुळे देखील चाचण्यांची संख्या मर्यादित वाटते, मात्र ती अपुरी निश्चितच नाही. 

या बदलांचा अर्थ चाचण्या पूर्ण क्षमतेने होत नाहीत, असा नाही. उलट ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळतात अशा नागरिकांची प्राधान्याने तपासणी करून टेस्टिंग किटचा प्रभावी व सुयोग्य वापर करण्याची कार्यवाही आयसीएमआर आणि शासन यांच्या निर्देशानुसारच केली जात आहे. यामागे शास्त्रीय आधार आहे. लक्षणे नसलेल्या बाधित यांच्याकडून संक्रमणाचा धोका हा अत्यल्प असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी वारंवार सांगितले आहे. याच कारणाने लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींच्या चाचणीला आयसीएमआर यांच्या निर्देशानुसार प्राधान्य दिले जाते. असे असले तरी बाधित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती स्वतःहून देखील चाचणी करून घेऊ शकतात.

महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण अलीकडे कमी झाल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामध्येही तथ्य नाही. मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर भागात पूर्वी चाचणी करणाऱया वैद्यकीय प्रयोगशाळांची संख्या मर्यादित होती. ही संख्या अलीकडे वाढली आहे. स्वाभाविकच उर्वरित महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या वाढली आहे. तर मुंबईतील दररोजच्या सरासरी चाचण्यांची संख्या कायम आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत चाचण्यांची टक्केवारी पूर्वीपेक्षा कमी दिसत असली तरी वास्तवात चाचण्यांची संख्या बदललेली नाही. मुंबईत आत्तापर्यंत सुमारे २ लाख १२ हजार चाचण्या झाल्या असून हे प्रमाण प्रति दशलक्ष १६ हजार ३०४ इतके आहे. हे प्रमाण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या कमी झाल्याचा मुद्दा आपोआप निकाली निघतो.

मुंबईमध्ये विविध २२ वैद्यकीय प्रयोग शाळांमधून कोरोना चाचण्या केल्या जातात. यामध्ये महानगरपालिकेच्या ३, शासनाच्या ५ आणि खाजगी १४ अशा प्रयोग शाळांचा समावेश आहे. या सर्व प्रयोगशाळांची मिळून दैनंदिन चाचणी क्षमता सुमारे १० हजार असली तरी ही संपूर्ण क्षमता एकट्या मुंबईसाठी नाही. मुंबई महानगर क्षेत्रातील बृहन्मुंबई वगळता इतर महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमधून केल्या जाणाऱया चाचण्या यासाठी देखील या प्रयोगशाळांची क्षमता उपयोगात येते. हा मुद्दा देखील लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे प्रयोग शाळा मुंबईत असल्या तरी त्या केवळ मुंबईतीलच नागरिकांच्या चाचण्या करतात, असे नाही. दैनंदिन चाचण्या करण्याची मोठी क्षमता असलेल्या तीन वैद्यकीय प्रयोगशाळा या नवी मुंबई, ठाणे येथे स्थित असून त्यांची क्षमता मुंबई वगळता इतर क्षेत्रांसाठी देखील उपयोगात येते. त्यामुळे मुंबईसाठीची क्षमता पूर्णपणे उपयोगात येत नाही, असे म्हणणे सुसंगत नाही.

कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यावर, मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनामुळे मृत्यू, अशी नोंद केली जात नसल्याचे देखील आक्षेप घेतले जात आहेत. याबाबत स्पष्ट करावेसे वाटते की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स ॲण्ड रिसर्च यांनी ठरवून दिलेल्या ICD 10 मार्गदर्शक तत्वांनुसार मृत्यू प्रमाणपत्र देण्याची, सर्व माहिती नोंदवून जतन करण्याची कार्यवाही केली जाते. त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसारच मृत्यूचे कारण (Cause of Death) व इतर माहिती नोंदवली जाते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रसंगी, त्याचा उपलब्ध अद्ययावत चाचणी अहवाल पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह - असे जे काही असेल त्याची वास्तविक, वस्तुस्थितीदर्शक नोंद या मार्गदर्शक सुचनांनुसारच मृत्यू प्रमाणपत्रावर केली जाते. अद्ययावत अहवाल उपलब्ध नसल्यास किंवा तो प्राप्त होणे बाकी असल्यास आणि दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या प्रकरणातही सदर मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करण्यात येते. तसेच, महानगरपालिकेच्या स्तरावरील मृत्यू चौकशी समितीची दर आठवड्यात दोन ते तीन वेळा बैठक होते. या समितीसमोर सर्व मृत्यू प्रकरणांशी संबंधित कागदपत्र सादर केली जाते. त्यामध्ये या कागदपत्रांची, मृत्यू पश्चात् प्राप्त अहवाल व इतर बाबींची पडताळणी करुन मृत रुग्णाची वस्तुस्थितीदर्शक माहिती नोंदवली जाते व अचूक माहिती जतन केली जाते. त्यातून रुग्णाच्या मृत्यू पश्चात्‌ नातेवाईकांना आवश्यक प्रक्रिया विनाअडथळा पार पाडता येते.त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्रावर कोविंड नोंद होतच नसल्याचा आक्षेपही योग्य नाही.

कोरोना बाधित मृतांची आकडेवारी देताना त्यासोबत त्यांना असलेल्या इतर आजारांचा ही उल्लेख केला जातो. याचा अर्थ कोविड हे कारण झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गृहीत धरला जाऊ नये. मुंबईतील आत्तापर्यंतच्या मृतांच्या विश्लेषणनुसार मधुमेह आणि अतिताण एकत्र आजार असल्याने ३२ टक्के, मधुमेहामुळे २७% आणि अति ताण असल्यामुळे २२ टक्के असे कोरोना सोबत इतर आजारांचे प्रमाण दिसून येते. हे विश्लेषण दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून देखील पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामागचा हेतू इतर आजारांचे निमित्त पुढे करणे असा होत नाही. उलट संबंधित इतर आजार असलेल्या नागरिकांनी आपापल्या परीने योग्य काळजी घ्यावी, नियमितपणे औषधे घ्यावीत, असे जाहीर आवाहन करून संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

कोरोना बळींची संख्या स्पष्ट दर्शवून त्यांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचे विलगीकरण करण्यात यावे, असा आग्रह धरला जात आहे. तथापि याबाबत स्पष्टपणे नमूद करावेसे वाटते की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्याच्याशी छेडछाड केली जात नाही. कोरोना बाधित व्यक्तींच्या नजीकच्या व अती जोखमीच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचे अलगीकरण करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. यामुळेच मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरून आता १६ दिवस इतका झाला आहे. मुंबईतील एकूण २४ पैकी १२ प्रशासकीय विभागांची कामगिरी या सरासरीपेक्षा देखील अधिक सरस आहे. हे सर्व अलगीकरण कार्यवाहीवर जोर दिल्यामुळे साध्य झाले आहे. 

मुंबईतील कोरोना बाधित मृत्यूचा दर हा यापूर्वीच नियंत्रणात आला असून तो आता राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे. त्यामुळे मृतांचे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आक्षेप देखील निकाली निघतो. १८ ते २४ मे या कालावधीत २८० इतके कोरोना बाधित रुग्ण दगावले. हीच संख्या २५ ते ३१ मे या कालावधीत २७० आहे. याचाच अर्थ मुंबईतील कोरोना बळींची संख्या वाढलेली नाही. तसेच दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून मृतांचे आकडे जाहीर केले जातातच, त्यामुळे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोपही योग्य नाही.

 कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास निश्चित नियमावलीनुसार सर्व प्रक्रिया करून, निर्जंतुकीकरण करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जातो. काही प्रसंगी नातेवाईकांशी संपर्क होईपर्यंत मृतदेह हस्तांतरण करण्यास अधिक वेळ लागतो. किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही तर पोलिस प्रशासनाकडे मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. अशा प्रसंगांची छायाचित्रे व व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे आवाहन वारंवार महानगरपालिकेने केले आहे. 

तसेच महानगरपालिकेच्या शववाहिनीतून रुग्णाचा मृतदेह थेट स्मशानभूमीमध्ये पाठवला जातो. अनेकदा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराची तयारी होईपर्यंत शववाहिका वाहनात मृतदेह राखून ठेवला जात असे. अशा कारणांनी स्मशानभूमीमध्ये शववाहिका अडकून राहू नये, शववाहिकेला विलंब होऊ नये म्हणून स्मशानभूमीत स्वतंत्र भागात कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह ठेवून योग्य प्रक्रियेनिशी  अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र स्वतंत्र भागात ठेवलेल्या या मृतदेहांची छायाचित्रे व व्हिडिओ देखील प्रसारित करून वस्तुस्थितीचा अनेकदा विपर्यास करण्यात आला आहे. ते देखील योग्य नाही.

कोरोना विषाणू संक्रमणाशी बृहन्मुंबई महानगरपालिका करत असलेले दोन हात हे एक युद्धच आहे. या आणीबाणीच्या काळात सर्वांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी पुनश्च एकदा सर्वांना विनंती आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट