छुप्या पद्धतीने चालू असलेल्या अनेक व्यवहारांमुळे मुलुंडमध्ये कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण

मुलुंड : (शेखर चंद्रकांत भोसले)   मुलुंडमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लॉकडाऊन असूनही लोकं रस्त्यावर मोकाट फिरत आहेत. मुलुंडचे सहाय्यक पोलिस आयुक्त पांडुरंग शिंदे यांनी एका वीडियोद्वारा मुलुंडकरांना दूपारी २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन केले असतानाही सर्रासपणे या आवाहनाला धुडकावून तरुण पिढी २ चाकी व ४ चाकी गाडय़ा घेवून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी आखून दिलेले नियम न पाळता काही नागरिक देखील विनाकारण घराबाहेर पडत आहेत. स्टेशन परिसरात फेरफटका मारताना दिसत आहेत. 



कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुलूंडची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने होताना दिसत असून सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता शासकीय नियम न पाळता घराबाहेर पडत आहेत. काही सोसायटीच्या आवारात रहिवासी एकत्र फेरफटका मारत आहेत तर काही सोसायटीच्या टेरेसवर एकत्र जमून खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अश्या काही बेशिस्त रहिवाशांमुळे सोसायटीतील इतर नागरिकांच्या जीवाला धोका पोहचत आहे. 


तसेच मुलुंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी भाजी विक्रीस परवानगी नसतानाही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने भाजी विकली जात आहे. मैदानात, मोकळ्या जागी, पदपथावर भाजी विक्री केली जात असून भाज्या खरेदीसाठी नागरिकांची या भाजी विक्रेत्यांकडे गर्दी होत असते. मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीत राजपथ इमारती समोरील मैदानात व बिल्डिंग नंबर ३३ समोरील पदपथावर अश्या दोन ठिकाणी सर्रास भाजी विक्री केली जात आहे व नागरिकांची येथे भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. काही जागरूक नागरिकांनी यासंदर्भात नवघर पोलिस स्टेशन व पालिकेला तक्रार देखील केली परंतु पोलिस येतात तेवढ्यापुरते हे धंदे बंद केले जातात व पोलिस जाताच पुन्हा चालू केले जातात. 

स्टेशन परिसरात कपड्यांची दुकाने देखील सुरू करण्यात आली असून तेथेही नागरिकांची वर्दळ होत असते. स्टेशन परिसरातील आशा झेरॉक्सचे दुकान अत्यावश्यक सेवेत येत नाही आहे तरी देखील ते चालू ठेवण्यात येत आहे. मोबाईल विक्रीच्या दुकानाचे व्यवहार शटर बंद ठेवून चालू असतात. बाहेर दुकानदाराचा माणूस ग्राहकांना काय हवे नको ते विचारून त्याप्रमाणे आतून वस्तू आणून देत व्यवहार करत असतो. शासकीय नियम, लॉकडाऊनचे नियम तोडून हे सर्व व्यवहार चालू असल्याने लोकं देखील घराबाहेर पडून गर्दी करत आहे. परिणामी कोरोना संसर्गाचे प्रमाण मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

दूपारी २ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे त्यामुळे मुलुंड पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्याचे ठरविले असून यापुढे गरज पडल्यास काठीचा प्रसाद, सोसायटय़ामध्ये जावून आवाहन, पोलिसांचा रूटमार्च, मोबाईल व्हॅनमधून मेगाफोनवरून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे व रस्त्यावर न थांबण्याचे आवाहन, इत्यादींचा समावेश आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला तरीही काही लोकांकडून पोलिसांच्या आवाहनाला बगल देत व्यवहार चालू असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे त्यामुळे प्रशासनापुढे कोरोनाला रोखण्यासाठी मोठे आव्हान उभे राहीले आहे. 




रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट