उद्योजकांनी आपले उद्योग खेड्याकडे वळवण्याची हीच वेळ

भारत देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला .आज देशाला स्वतंत्र मिळून 74 वर्षे पूर्ण झालेली आहे. महात्मा गांधी यांनी याच दरम्यान सर्व भारतीयांना  संदेश दिला की,  - 'खेड्याकडे चला'. परंतु या विपरीत उलटे झाले. शहरातील तरुणांनी खेड्याकडे न येता,  खेड्यातीलच तरुण युवकांनी शहराकडे धाव घेतली. 1970-80 दशकात हा तरुण शहरात वास्तव्यास राहू लागला . औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करू लागला,  व तेथेच स्थायिक ही झाला . खेड्यांमध्ये  केवळ शेतकरी,  काही प्रमाणात मजूर व वयस्क वडीलधारी मंडळीच राहिली. मोठे उद्योग, कारखाने शहरात असल्याने शहराची झपाट्याने वाढ होत गेली. शहरे खेड्यांच्या किती तरी पुढे निघून गेली . औद्योगिक करणाची सर्व साधने,  दळणवळण,   अर्थव्यवस्था  शहरात असल्याने  शहरे तरुणाच्या गळ्यातील  ताईत बनली. शहरा विषयी  नवीन  युवकांना  आकर्षण वाटू लागले. व  शहरीकरणातील जीवनामध्ये ते व्यस्त होऊन आपले जीवन जगत राहिले. काहींना त्याच्यामध्ये यश मिळाले, योग्य नोकऱ्या ही मिळाल्या. तर काहींनी छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय येथेच सुरू केले .छोटी-मोठी कामे हाती घेऊन आपले जीवन शहराशी जोडून घेतले. परंतु मागील दोन दशकांमध्ये  पाहिलं गेलं तर शहर हे नवीन युवकांचे व छोट्या रोजगारांचे राहिलेले नाही. जर एखादा व्यक्ती शहरात कामाच्या शोधात गेला, तर त्याला तेथे नोकरी मिळवणे कठीण झाले. नोकरीच्या शोधात आलेला हा तरुण केवळ रोजगारच मिळू शकला. छोटे मोठे काम करून तो आपला उदरनिर्वाह करू लागला. परंतु  या शहरांमध्ये राहण्यासाठी छोटीशी रूम ही मिळवणे त्याला कठीण होऊन बसले . तो स्वतःच वास्तव्य एखाद्या ब्रिजच्या खाली किंवा फुटपाथवर घालवताना दिसतो. म्हणून आजच्या घडीला शहरामध्ये नवतरुणांना जीवन जगणे खूप कठीण जात आहे. 

मागील काळात काही प्रमाणात ग्रामीण भागात ही नवचैतन्याची लहर आली होती .सहकार क्षेत्रात नव्या क्रांतीची दारे ग्रामीण भागातील तरुणासाठी उघडली गेली होती. महाराष्ट्रामध्ये  सहकार क्षेत्रामध्ये  सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, दूध डेरी,  कुटिर उद्योग,  शेळीपालन,  बचत गट  अशा छोट्या-मोठ्या उद्योगांना  चालना देण्याचे काम  सरकार ने ही केले होते.  त्यापासून  ग्रामीण भागातल्या  काही तरुणांना व शेतकऱ्यांना  दिलासा ही मिळाला होता. तरुण वर्ग  या सहकार क्षेत्राशी जोडला गेला होता.  परंतु  या क्षेत्रामध्ये  सातत्य न राहिल्यामुळे  त्यात ही शिक्षित तरुणाला,  शेतकऱ्याला व  मजूर वर्गाला  निराशाच मिळाली . या निराशे पोटी हाच तरुण वर्ग परत शहराशी आकर्षित झाला. कमीत कमी रोजचे आपले पोट भरेल या आशेपोटी तो शहरास राहू लागला.
 2020 च्या सुरुवातीपासूनच  संपूर्ण जगात कोरोना व्हायरस  महामारीने  थैमान घातले. सर्व जगातील सरकारने आपल्या देशास लॉक डाऊन करून टाकले. लॉक- डाऊन अवस्थेत संपूर्ण जगाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झाली. याच परिस्थितीचा शिकार भारत देश ही झाला .त्यामध्ये सर्वात जादा शिक्षित बेरोजगार वर्ग व मजूरांचे नुकसान झालेले दिसून आले.मोठे उद्योग, लघुउद्योग ही बंद पडले. काहींच्या नोकऱ्या ही गेलेल्या आहे.  भारताचा नवतरुण  बेरोजगार झालेला दिसत आहे. याच धर्तीवर भारतामध्ये शहराशी जोडले गेलेले  सहा कोटी मजूर कामगार बेरोजगारी कडे वळलेले आहे. हातावरील पोट असल्यामुळे त्यांचे उदरनिर्वाह शहरात होणे कठीण झाले. या कारणाने सर्वांनी आपल्या मोर्चा खेड्यातील गावाकडे वळवला आहे. 

आजच्या  घडीला ग्रामीण भागातील शिकलेला तरूण हाताला काम नसल्याने बेरोजगार झालेला दिसत आहे . वेळोवेळी निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी ही हताश आहे.  त्याच्या शेत मालास  योग्य भाव ही मिळत नाही. म्हणून तोही उदासीन झालेला दिसत आहे. शेती असून ही निरंतर पाऊस नसल्यामुळे  आज खेड्यामध्ये ऱोजगार दिवसेंदिवस कमी होत आहे. आजची शेती ही यंत्राच्या आधारे चालत असल्याने छोटा-मोठा जो रोजगार होता तोही गेला आहे. यामुळे शहरातील आलेला रोजगाराला गावामध्ये आपला उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण जाणार आहे.या उदासीनतेला बळ देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.याच परिस्थितीचा फायदा घेऊन छोट्या-मोठ्या उद्योजकांनी आपले उद्योग धंदे खेड्यामध्ये सुरू करण्याची वेळ आलेली आहे.

 आज एकविसाव्या शतकातील पूर्ण जगाचा इतिहास पाहिला असता पूर्ण जग हे खेड्यापासून शहरापर्यंत जोडले गेलेले आहे.खेडे आणि शहरे एक समान झालेली आहेत. इंटरनेटच्या जगामध्ये सर्वजण एकमेकांशी जोडले गेलेत. दळणवळणाच्या सुविधा,  ट्रान्सपोर्ट ही सर्व एकमेकांशी जोडलेली आहेत.सर्वदूर आज औद्योगीकरणाचे जाळे पसरलेले आहेत. या संधीचा फायदा घेऊन भारतातील छोट्या-मोठ्या उद्योजकांनी आपले उद्योग खेड्याशी जोडण्याची वेळ आली आहे. याचा फायदा गरीब मजूराला ही होऊ शकतो व उद्योजकांना ही होऊ शकतो. शहरांमध्ये वीस हजार पगार जरी असला तरी तो पगार शहरात राहणाऱ्या व्यक्तीस कमीच पडतो. परंतु हाच पगार पंधरा हजार त्याला आपल्या गावात मिळाला तर तो सुखी व समाधानी राहू शकेल.  तो ताण-तणावापासून  दूर राहू शकेल. व आणखी जोमाने आपले काम करून उद्योजकास फायदा करून ही देऊ शकतो. शहरात डबघाईला आलेल्या उद्योजकाने आपला मोर्चा खेड्याकडे वळावा व खेड्यांना शहरासारखी समृद्ध बनवण्याची कामगिरी करावी.खेडे समृद्ध तर शहरे समृद्ध. शहरे समृद्ध तर भारत देश समृद्ध. देशाला समृद्ध बनवण्यासाठी सर्वांचा हातभार मोलाचा असतो. चीन चे उदाहरण घेतले तर चीनला महासत्ता बनवण्यामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे. असा समावेश आपण सर्वांनी केला तर भारत देश  नक्कीच महासत्ता होऊ शकेल.

डॉ. कृष्णा गायकवाड
 असिस्टंट प्रोफेसर
 मुक्ताईनगर

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट