मी बाळासाहेबांमुळेच घडलो, कोणत्याही ठाकरेंबद्दल मनात आकस नाही खासदार नारायण राणे

नारायण राणेंना घडवण्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे आहे. मी शिवसेनेत असताना माझे कर्तव्य पूर्ण केले. आजदेखील कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही. कोणीही जर टीका केली तर त्या टीकेला मी नक्कीच उत्तर देतो. पण कोणाविषयीही मनात कटुता नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी सांगितले. साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवादात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.

शिवसेनेच्या जन्मापासून मी शिवसेनेसोबत होतो. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसैनिकांना नावाने ओळखत त्यापैकी मी एक होतो. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्टचा अध्यक्ष या वेगवेगळ्या पदांवर उत्कर्ष होत गेल्याने मी बाळासाहेबांच्या जवळ गेलो. त्यावेळी बाळासाहेब मला अनेक कामं सांगत होते. निवडणुका आल्या की गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पाठवलं तरीही मी गेलो. गडचिरोलीसारख्या ठिकाणीही मी शिवसेनेच्या दोन जागा निवडून आणल्या. त्यानंतर बाळासाहेबांचा माझ्यावर विश्वास बसला. त्यांचे प्रेम मला मिळाले. मी बाळासाहेब ठाकरेंसाठी वेडा होतो, असेही राणे यांनी यावेळी भारावून सांगितले.

शिवसेनेतले अनेक लोक माझ्या बाजूने होते. ठराविक दोघे-तिघेच असे होते ज्यांनी माझ्याविषयी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मत कलुषित केलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचे कान भरु लागले. माझ्याबद्दल मन दुषित करण्याचं काम झालं. बाळासाहेबां कडून याबाबत विचारणाही होत नव्हती. त्यानंतर मी बाळासाहेबांना सहा पानी पत्र लिहिलं होतं. मी त्यावेळी दहा ते बारा दिवस अमेरिकेला गेलो होतो. त्यानंतर परत आलो. त्यावेळी १२ दिवसांमध्ये काय काय कट-कारस्थानं झाली ते समजलं. माझ्या पत्रकार मित्रांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो. त्यांना भेटून आश्वासन दिलं की मी राजकारण सोडतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. राजकारणात जाणार नाही असंही सांगितलं होतं. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी काही लोकांना बोलावलं आमचं बोलणं झालं. सगळं काही स्पष्ट झालं. मात्र काही दिवसांनी पुन्हा कारस्थानं होऊ लागली. त्यामुळे मी राजीनामा देण्याचं नक्की केले, असे ते म्हणाले.

त्यानंतर एक दिवस मी पनवेलला होतो. मी पनवेललाच राजीनामा तयार केला आणि मातोश्रीवर पाठवला. मी मुंबईला येईपर्यंत राजीनामा मंजूर झाला होता. अशा रितीने मी बाहेर पडलो. कोणतीही तक्रार माझ्या विरोधात नसताना मला बाहेर पडावं लागलं. मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे. माझ्या यशाचं सगळं श्रेय हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. मी त्याचं एक टक्काही श्रेय घेणार नाही. जे काही शिवसेनेसाठी केलं ते मी कर्तव्य म्हणूनच केलं. ठाकरे या आडनावावर माझी सगळी श्रद्धा आहे. त्यामुळे ठाकरे आडनावाचे आत्ता जे कुणीही आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात छोटासाही आकस नाही, मी आकस ठेवत नाही. राजकीय टीका केली तर मात्र मी उत्तर देईन, असेही नारायण राणे म्हणाले.

शिवसेनेत परत येणे जमणार नाही, असे म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये कोणाला कोणती पदं द्यावी आणि कोणाला कोणती देऊ नयेत, यात तरबेज असणारी अनेक लोकं आहेत. मलाही मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. परंतु तुम्हालाच मुख्यमंत्री करणार या आश्वासनावर काँग्रेसमध्ये दहा वर्षे गेली, असे मत नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केले.

काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. सोनिया गांधी या आजही आदर देतात. अनेकदा भेट होते तेव्हा विचापूसही करतात. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबद्दल मनात आजही कटुता नाही. पण पक्षातील काही मंडळी काही गोष्टी करण्यात तरबेज आहे. त्यामुळे आपले भवितव्य अंधारातच आहे असे वाटले, म्हणून मी काँग्रेसचा राजीनामा दिला, असे राणे यांनी स्पष्ट केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट