बॉलिवूडचा 'चॉकलेट हिरो' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

मुंबई:चित्रपट सृष्टीला गेल्या २४ तासांत दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांना जाऊन आणखी २४ तास देखील झाले नाहीत तोपर्यंतच ऋषी कपूर यांचे निधन झाल्याची बातमी आली आहे. याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळते आहेत.

बॉलिवूडचा 'चॉकलेट हिरो' अशी बिरुदावली मिरवणारे, कपूर खानदानाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे आणि सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गुरुवारी सकाळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी दिली. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील 'सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन' हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

ऋषी कपूर यांना २०१८ मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रकृती खालावल्यामुळे काल (बुधवारी) कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याच्या निधनानंतर २४ तासातच ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आल्याने बॉलिवूडसह चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे.

ऋषी कपूर यांचा परिचय

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव ऋषीराज कपूर. ऋषी कपूर हे द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे नातू. मुंबईतील चॅम्पियन स्कूलमध्ये ऋषी कपूर यांचं शिक्षण झालं. 'चिंटू' या टोपणनावाने ते कपूर कुटुंबासह चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते. ऋषी कपूर यांनी १९७० साली प्रदर्शित झालेल्या 'मेरा नाम जोकर' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉबी' चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

ऋषी कपूर यांनी जवळपास १२० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत गाजवला होता. २००८ मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.ऋषी कपूर यांनी भूमिका साकारलेले लैला मजनू, रफूचक्कर, सरगम, कर्ज, प्रेम रोग, नगिना, हनिमून, चांदनी, हीना, खेल खेल मै, अमर अकबर अँथनी, हम किसीसे कम नही, बदलते रिश्ते, सागर असे एकापेक्षा एक चित्रपट गाजले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत ऋषी कपूर यांची पडद्यावरील जोडी लोकप्रिय ठरली होती.ये हे जलवा, हम तुम, फना, नमस्ते लंडन, लव आज कल, पटियाला हाऊस यासारख्या चित्रपटात त्यांनी सहकलाकार म्हणून काम केले. हाऊसफुल २ या चित्रपटात त्यांनी भाऊ रणधीर कपूर सोबत काम केले. 'खजाना' या चित्रपटानंतर हा दोन्ही भावांचा एकमेव चित्रपट होता.१९९९मध्ये त्यांनी 'आ अब लौट चले' हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात राजेश खन्ना, ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना यासारखी तगडी स्टारकास्ट होती.'कुछ तो है' या सिनेमात ऋषी कपूर यांनी साकारलेला 'सायको किलर' चांगलाच गाजला. त्यानंतर हृतिक रोशनसोबत अग्निपथ चित्रपटात त्यांनी रंगवलेला 'रौफ लाला' हा खलनायक भाव खाऊन गेला होता.ऋषी कपूर यांच्यासाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक दिग्गज गायकांनी गाणी गायली. विशेष म्हणजे ही सर्वच गाणी चांगलीच गाजली.ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या नावाने लिहिलेले आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

कर्करोगाचं निदान

२०१८ मध्ये कर्करोगाचं निदान झाल्यानंतर ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी मुलगा-अभिनेता रणबीर कपूरसोबतच आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, अनुपम खेर, आमिर खान, शाहरुख खान, दीपिका पदुकोन, करण जोहर आणि मलायका अरोरा असे अनेक कलाकार त्यांना भेटून गेले होते. उपचाराअंती जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर ऋषी कपूर सप्टेंबर २०१९  मध्ये मायदेशी परत आले होते.'मला आता बरं वाटतंय आणि मी कोणतंही काम करु शकतो. पुन्हा अभिनय सुरु करण्याचा विचार आहे. प्रेक्षकांना आता माझं काम आवडेल की नाही, हे माहित नाही. न्यूयॉर्कमध्ये मला बर्‍याचदा रक्त देण्यात आलं. तेव्हा मी नीतूला म्हणायचो - मला आशा आहे, नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही' अशी प्रतिक्रिया ऋषी कपूर यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये दिली होती. ऋषी कपूर यांनी चित्रपटांच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. अभिनेत्री जुही चावलासोबत 'शर्माजी नमकीन' या सिनेमाचं चित्रीकरण त्यांनी सुरु केलं होतं. मात्र त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपुरीच राहणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट