
बदलापुर येथिल स्थलांतरितांची नगराध्यक्षांनी केली विचारपूस.
- by Rameshwar Gawai
- Apr 19, 2020
- 926 views
बदलापूर/ प्रतिनिधी : लॉकडाऊनमुळे मूळ गावी न जाऊ शकलेल्या ५० स्थलांतरितांची कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कुळगाव शाळेत राहण्याची व दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी या शाळेला भेट देऊन स्थलांतरितांची आस्थेने विचारपूस केली.
बदलापुर चे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी नगर परिषदेच्या कुळगाव शाळेत असलेल्या स्थलांतरितांची तसेच तात्पुरत्या बेघर निवारा केंद्रातील बेघर व्यक्तींची भेट घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर मास्कचा वापर करण्याचे व सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले. सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावी न जाऊ शकलेल्या स्थलांतरित नागरिकांची कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कुळगाव शाळा क्रमांक १ येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेच्या एका इमारतीत २५ महिलांची तर दुसऱ्या इमारतीत २५ पुरुषांची रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थलांतरितांना दररोज दोन वेळच्या जेवण्याची व्यवस्थाही इथे सुरु करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून केली जात आहे. त्याशिवाय कम्युनिटी किचनच्या माध्यमातून या शाळेत २०० व बदलापूर पश्चिमेकडील पाटील मंगल कार्यालयात २०० याप्रमाणे दररोज ४०० लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे शिक्षण विभागाचे अधिकारी तथा कोविड १९ चे नोडल अधिकारी विलास जडये व चारुदत्त सोनवणे यांनी दिली. गावदेवी रोड येथे ३३ बेघरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांनाही दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. त्याशिवाय शहरातील गरजू व्यक्तीनाही कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण देण्यात येत असल्याचे विलास जडये यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम