चहा प्यायल्यानंतर कप फोडला , डोळ्यात पाणी येत होतं.....!
बच्चू कडू यांनी अनुभवलेले कोरोनाचे ३ दिवस..
- by Adarsh Maharashtra
- Apr 03, 2020
- 1068 views
घशात थोडे खवखव करत होते. २ दिवसात थोडा खोकलाही आला. मनात शंका सतावायला लागली, मी कोरोनाला बळी तर पडणार नाही ना...? म्हणून २३ तारखेला अमरावती सिव्हील सर्जनला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. मग मी अकोला सिव्हील सर्जन श्री.चव्हाण यांना फोन केला. त्यांना म्हटलं मला थोडीशंका येत आहे. ते म्हणाले घाबरू नका, उद्या अमरावती सिव्हील सर्जनशी बोलून गोळ्या पाठवतो आणि तपासणी करायला लावतो. गोळ्या आल्या, तपासणी केली. पण काही निघालं नाही. मी कामाला लागलो.
मला खुप शंका यायच्या. आपल्याला जर कोरोनाची लागण लागली तर खुप मोठी आफत होईल. आपण रोज घराबाहेर पडत आहो, इतके लोक आपल्याला भेटतात. आपल्यामुळे इतर लोकांचा बळी जाईल.झोप येत नव्हती.
त्यात घरी माझा मुलगा देवा नेहमी मला टोकायचा. त्याच १० वी चा पेपर होता.तो खुप पोटतिडकीने लोकांना भेटू नका म्हणून सांगायचा. बायको नयना देखील खुप सांगायची. पण लोकं ऐकत नसायचे. कुणाला नाही म्हणता येत नव्हते. काही लोक तर स्वत म्हणायचे लोकांना भेट नका, अन तेच लोक इतर लोकांना घेऊन भेटायला यायचे.
भेटणाऱ्यांची गर्दी वाढतच होती. अखेर देवाचे पेपर संपले आणि आम्ही कुरळपूर्णा येथे आलो.
पण कशाचं ! टिव्हीवरच्या बातम्या, सोशल मिडीयावरची माहिती मन सुन्न करणारी होती. घरी गुदमरल्यासारखं व्हायचं. आपण घराच्या बाहेर निघालं पाहिजे. शेवटी घराच्यांची नाराजी घेत अकोला. अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यात कोरोना निर्मुलनाच्या कामात लागलो. रात्री झोपताना नवनवीन कल्पना यायच्या. अधिकारी/कर्मचाऱ्यांची मिटींग घेऊन अंमलबजावणी करायची. अधिकारी/कर्मचारी रोज घराबाहेर काम करायचे. त्यांच्याबद्दल खुप आस्था वाटायची. २६ मार्चला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथे एक तरुण डॉक्टर होती. त्यांना विचारपूस केली. दोन संशयीत रुग्णांना रेफर केले. तपासणी किट नाही, चांगले मास्क नाही, तुमच्यासारखे मास्क पाहिजे होते अशी ती डॉक्टर म्हणत होती. माझ्या मनात आलं आपला मास्क काढून द्याव, पण माझी बिमारी त्यांना लागली तर..
असा विचार करून राह दिलं. मी तशा मास्कसाठी खुप प्रयत्न केले, परंतू भेटले नाहीत. अपूर्ण व्यवस्था, काहीच सुरक्षितता नाही, तरीदेखील ते सर्व काम करत असल्याचे पाहून मी खुप प्रभावीत झालो. नंतर व्हेंटीलेटरची व्यवस्था पहिली. IcU थोड्या कामासाठी बंद होते. त्याकरीता फोन लावले व पत्र द्यायला सांगितले.
त्यांनतर मी अमरावती सिव्हील सर्जन श्री.निकम यांना फोन करुन माझी तपासणी करून द्यायला सांगितले. त्यांनी तपासणीकरीता नर्स पाठविली.
दि.२७ मार्चला मी कुरळपूर्णा येथे होतो. नयनाला निकम सरांचा फोन आला आणि रिपोर्ट थोडे डाऊटफुल आहेत असे त्यांनी सांगितले. मी फोन केला तर मला म्हणाले बाँडीवर आहे. मी समजून गेलो, काहीतरी प्रॉब्लैम आहे. २९ मार्चला पून्हा तपासणी करावी लागणार होती. तोपर्यंत आयसोलेट राहावे लागणार होते.
मग माझा बेड वेगळा, ताट वेगळे अशी घरातली सर्व मोहिम नयनाने सुरू केली. दुरुन वाढणे. मला वेगळ्या कपात चहा आणला. चहा पिल्यानंतर मी तो कप धुतला. धुतल्यानंतर म्हटलं हा कप पून्हा कोणी वापरायला नाही पाहिजे, म्हणून थोडा फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्ण फुटला.
मी एका दिवसात खुप काही विचार करीत होतो. माझे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले तर... मी कोणाकोणाच्या संपर्कात आलो... माझ्यामुळे किती वाईट होईल.... ते व्हायला नको... नयनाची तब्येत नाजूक आहे. तिला झालं तर कसं होईल... सारखे असे विचार येत होते.
देवा लहान आहे. दोन पूतण्या व विक्रमची लहान मुलगी.. डोकंच काम करत नव्हतं. डोळ्यात पाणी येत होतं.
माझ्यामुळे परिवाराला काही वाईट होऊ नये...लोकांचे कार्यकर्त्यांचे वाईट होऊ नये...असे विचार येत होते.
काही जवळच्या लोकांचे पैसे अंगावर होते. काहींना मदत करायची होती. काही वाईट झालं तर कसं होईल...? मी डोळ्याने मरण पाहत होतो. दुखं एवढंच वाटायचं की माझ्यामुळे कोणाला मरण यायला नको.
नयनाची खुप काळजी वाटत होती.रोज सोबत जेवायचो. आज मात्र काळजी घेऊन दुर एकटा जेवताना अनेक विचार येत होते. माझा हात कुठं लागला तर... माझा हात म्हणजे विष होते. कुठे लागायला नको. अनेक गोष्टी मनात येत होत्या. संपर्कात आलेल्या लोकांची काळजी वाटत होती.
२७ तारखेचे ९.४१ वाजले. झोपायचे होते, पण झोप येत नव्हती. रिपोर्ट चांगला येईल असा विचार करून हिम्मत धरुन अंग टाकलं.झोपताना देवा आला.हिम्मत हारूनका, काही होणार नाही म्हणला. नंतर नयना आली.तीनेही मला उदहरणासहित हिम्मत दिली. रोज मी, देवा, नयना एकत्रित झोपत होते.
आज मी एकटाच वेगळ्या खोलीत झोपलो होतो. सकाळ झाली. चहा प्यायला जाणार तितक्यात लक्षात आलं, आपल्याला तिकडं जाता येणार नाही. नंतर नयना चहा घेऊन आली. तिने माझ्या कपात चहा टाकला. एकटाच पिलो. लोकांचे SMS पाहिले. १०-१५ फोन लावले, काही काम केली. प्रशासनाला १० ते १४ मार्च अगट, १५ ते २० मार्च ब गट आणि २१ ते २९ मार्च क गट, असे बाहेरून गावात आलेल्या लोकांचे गट तयार करायला लावले.
आज सिव्हिल सर्जन ला फोन केला. ते म्हणत होते पून्हा २९ ला तपासणी करावी लागेल, मग दोन दिवसात समजेल.
खुप वाईट वाटत आहे. माझ्या संपर्कात हजारो लोक आले. त्यांचं काय होईल. माझ्या परिवारातील सगळे पॉझिटीव्ह आले तर सारं काही एका क्षणात वाईट घडेल.
माझ्या चुकीला काहीच क्षमा नाही. मी माझ्या देवाचं, नयनाचं ऐकलं असतं, लोकांना भेटलो नसतो, तर हा अनर्थ घडलाच नसता. मला स्वतबद्दल खुप वाईट वाटत होतं.मी का ऐकलं नाही? लिहीतांना डोळ्यातून पाणी यायचं.देवा, नयना खुप धीर देत होते. नयनाचं डोकं दुखत होतं, तरी ती माझी काळजी घेत होती. तिला पाहून माझ्या मनात अपराध्याची भावना येत होती. मी तिला सुख तर काहीच दिलं नाही, उलट दुखच दिलं.
सर्व कार्यकर्ते, कार्यक्रम डोळ्यासमोर येत होते. २५ वर्ष केलेल्या संघर्षाला आता कुठे सुखाची किनार लाभली होती.
काही महत्त्वाचे प्रामाणिक कष्ट उपसलेल्या पण गरीब कार्यकत्यांसाठी योजना आखल्या होत्या. त्या मागे पडणार का ? अनेक प्रश्न निर्माण होत होते.
मरण डोळ्यासमोर पाहत होतो. इतक्यात मी गावागावात जाऊन लोकजागृतीसाठी लोकांना केलेल्या "घराबाहेर निघु नका" या माझ्या आवाजातल्या सुचना सांगणार्या ऑटोचा आवाज माझ्या कानावर पडला. मी लोकांना सांगत होतो खिडकीतून जग पहा जग जिंका, परंतू मी आणि माझा परिवार व माझ्या संपर्कात आलेले लोकच जगातून जाणार का... या प्रश्नाने मी माझ्यावरच चिडत होतो. लोकांना ज्या सुचना दिल्या त्या मी पाळल्या असत्या तर... मी खूप हारलेल्या मानसिकतेत होतो.डॉ.प्रफुल्ल कडू व डॉ.शिवरत्न शेटे यांना फोन केला. त्यांनी धीर दिला आणि काही औषधे सांगितली. ४:३४ ला उद्धवजींचा फोन आला. काही मिनिटे बोलणं झालं. त्यांनी घरीच राहायला सांगितलं. मला बरंच बोलायंच होत, पण रेंज बरोबर नव्हती.
आता उद्या ११ वाजता माझी पून्हा तपासणी होईल.मग पाहू मी निगेटिव्ह आहे की पॉझिटीव्ह.काय होईल माहित नाही.
खूप घबराहट आहे. कारण मी बऱ्याच लोकांसोबत संपर्कात आलो आहे. मला पापी नाही व्हायचं. स्वतःच्या मनाला सावरत आहे. पॉझिटीव्ह आला तरी जगावं लागेल. स्वतची हिम्मत वाढवावी लागेल. बस एवढंच हाती आहे. उद्या माझा रिपोर्ट येणार आहे. मी खूप घाबरत आहे. कारण हजाराच्या वर लोकांना भेटलो. मला एक वाईट वाटत आहे, माझ्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम होईल.दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले तर आनंद होईल कारण माझ्यामुळे कोणी अडचणीत येणार नाही आणि पॉझिटीव्ह आल्या तर हजार लोक अडचणीत येणार. सगळ्या पापाचा वाटेकरी मी होणार. हे दुख नशीबी येऊ नये, मोबाईलवर बातमी पाहिली ब्रिटनच्या राजकुमाराच्या राजघराण्यातील पहिला बळी. खुप अस्वस्थ
देवा माझा मुलगा आला. तो मला ठेवलेल्या ठिकाणी गेला. मी म्हणालो अरे तिथं नको जाऊ.तो म्हणाला बाबा तुमचं असं आहे. लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. खरं होतं त्याचं. मी ऐकलं नाही त्यामुळेच माझ्यासह सर्वच अडचणीत आले.
काही तास आहे माझा रिपोर्ट यायला. रात्रभर झोपच लागली नाही. नयना आणि देवाला भर्ती केल असं स्वप्न पडलं.
प्रतिक्षेचे तास संपले. माझा रिपोर्ट आला. माझा खाजगी सचिव अनुप खांडे याचा ७:३० वा फोन आला. भाऊ तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. मी खूप उंच उडी घेतली. नयनाला मिठी मारली. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. नयनाला मी निवडून आल्यापेक्षाही जास्त आनंद झाला. असे आनंदाचे अश्रू माझ्या जनता जनार्दनाच्या डोळ्यात दिसू दे हीच प्रार्थना आहे. काका, मामा, भाऊ, बहिण, कार्यकर्त्यांकडुन देवाला हाक न मारता, मी तुम्हाला हाक मारतो. हात जोडतो.
पाया पडतो. आपण नियम पाळा, कारण ३ दिवस मी माझा मृत्यु पाहत होतो. मी स्वतः मरायला तयार आहे. पण या आजारामुळे आपण स्वतः इतरांच्या मराणाचे भागीदार आपण बनतो, हे सर्वात मोठे दुख आहे. माझ्यामुळे माझा परीवार, गाव, देश अडचणीत येत असेल तर हात जोडतो, घराबाहेर निघु नका, जिथे आहात तिथेच राहा. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या. घाबरू नका. आम्हा आहोत.
मला डॉक्टरांनी सांगितलं तुमची अजून एक तपासणी झाल्याशिवाय घराबाहेर निघु नका. आम्ही सर्वजण प्रचंड तणावात होतो. कारण रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असता तर...बरच वाईट झाल असतं.
असो. एवढचं सांगतो, तुच आहे तुझ्या व इतरांच्या जिवनाचा शिल्पकार.
नियम पाळा कोरोना टाळा...
आपला बच्चू कडू
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम