कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोनामुक्त; लवकरच मिळणार डिस्चार्ज
- by Adarsh Maharashtra
- Mar 24, 2020
- 946 views
मुंबई: महापालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यानंतरही गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, असे आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्याने सरकारने अखेर संचारबंदी लागू केली आहे. राज्यात एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूची लागण झालेल्या 12 रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. यामुळे, पालिकेच्या आरोग्य विभागाला या रुग्णांना बरे करण्यात मोठे यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या 12 रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
असा होतो रुग्ण निगेटिव्ह -
कोरोना विषाणूची लागण झालेला किंवा ज्याला लागण झाल्याचे संशय आहे, अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. स्वाबच्या साहाय्याने रुग्णाच्या घशातील लाळ घेऊन त्याची तपासणी करण्यात येते. त्यात तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर उपचार केले जाते. रुग्णाला 14 दिवस रुग्णालयात ठेवले जाते. या कालावधीत त्या रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढवली जाते. त्याला ताप, सर्दी, खोकला झाल्यास आवश्यक ती औषधे दिली जातात. या दरम्यान रुग्णाची अनेकदा तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या दोन चाचण्या लागोपाठ निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण बरा झाला आहे, असे समजल्या जाते.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम