काँग्रेसमध्ये १५ नेते इच्छुक

राज्य सभेच्या चौथ्या जागेवरून आघाडीत बिघाडी


मुंबई (प्रतिनिधी): येत्या २६ मार्च रोजी राज्य सभेच्या ५५ जागांसाठी निवडणूक होत असून यात महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांच्या चार जागा निवडून येऊ शकतात मात्र चौथ्या जागेवरून तिन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत तर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी तब्बल १५ इच्छुक असल्यानेच काँग्रेसने २ जागांची मागणी केली आहे.
राज्य सभेसाठी आता महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात उमेदवारी देण्यावरून चांगलेच वाद सुरू झाले आहेत. भाजपने आपल्या वाट्याच्या तीन जागांपैकी उदयनराजे आणि आठवलेंची उमेदवारी नक्की केली आहे तर तिसऱ्या जागेसाठी निष्ठावान खडसे की बाहेरून आलेले काकडे असा वाद आहे, तर महाविकास आघाडी मधील संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असून चौथ्या जागेसाठी आघाडीतील तिन्ही पक्ष इच्छुक आहेत. राष्ट्रवादीने तर शरद पवार आणि फौजिया खान यांची उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेनेनेही आपले उमेदवार ठरवलेत पण काँग्रेसने मात्र दोन जागांवर दावा केलाय. संख्याबळानुसार सेना ५६,राष्ट्रवादी ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत पण काँग्रेसला सत्तेत कमी वाटा मिळाल्याने त्याची भरपाई राज्यसभेची एक जागा जास्त देऊन करावी अशी काँग्रेसची मागणी आहे आणि यावर चर्चा सुरू असून या एका जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित पोस्ट