कोरोनामुळे होळीचा रंग फिका
रेन डान्सचे अनेक कार्यक्रम रद्द
- by Reporter
- Mar 11, 2020
- 387 views
मुंबई(प्रतिनिधी): यंदा संपूर्ण जगावर कोरोनाची दहशत असून कोरोना बाबतच्या अफवांमुळे या दहशतीत आणखीनच भर पडली त्यामुळे यंदा होळीचा रंगही फिका पडल्याचे दिसत होते. कोरोनाच्या भीतीमुळे यंदा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील रेन डान्सचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले दरम्यान देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४६ झाली असून काल ५८ जणांना इराण मधून भारतात आणण्यात आले. देशात होळी आणि धुळवडीची सर्वत्र धमाल असते मात्र यंदा होळी आणि धुळवडीवर कोरोनाची दहशत होती. जगभरात ८८ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून ४ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे ४६ रुग्ण आढळले असून त्यात पुण्यातील पती पत्नीचा समावेश आहे. सर्व पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी एकत्र काम नका, शिंकताना रुमाल बाळगा, हस्तालोंदन करू नका कारण कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने हवेतून सुद्धा त्याचा झपाट्याने फैलाव होतोय असे सांगितल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि याच भीतीपोटी काल मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रंगांची उधळण किंवा बच्चे कंपनी पिचकाऱ्या मारताना कुठे दिसले नाहीत. एरव्ही धुळवडीच्या दिवशी सोसायट्यांमध्ये रेन डान्स आयोजित केले जातात पण काल मुंबईत नागरिकांनी रेनडान्स आयोजित करण्याचे टाळले मात्र सोसायटीच्या आवारांमध्ये होळया पेटवल्या पण धुळवड अगदी साध्या पद्धतीने नैसर्गिक रंग वापरून साजरी करण्यात आली. चित्रपट सृष्टीतील कलाकारांची धुळवड ही सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतो पण त्यांनीही यंदा कोणतेही रंगाचे कार्यक्रम आयोजित केले नाहीत किंवा रस्त्यावर रंगाचे पाणी भरून लोकांवर फेकणारे यावेळी फारसे दिसले नाहीत. काल सार्वजनिक सुट्टी असूनही रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता इतकी लोकांनी कोरोनाची दहशत इतकी घेतलेली दिसत होती. जिथे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमितशहा यांनी यंदा रंगपंचमी साजरी केली नाही तिथे इतरांचे काय? दरम्यान काल इराण मध्ये अडकलेल्या १२० भारतीयांनी ५८ जणांना खास विमानाने भारतात आणण्यात आले तर दुसरीकडे पुण्यातील जे दांपत्य कोरोनाग्रस्त आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. पुण्यात कोरोनचे दोन रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जात आहे या सर्वांना नायडू रुग्णालयात ठेवण्यात आले आहे त्यासाठी खास आयस्युलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांच्या किंवा संशयितांच्या उपचारात खंड पडू नये म्हणून पुण्यातील सर्व डॉक्टरांच्या सुट्टया रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रिपोर्टर