पालिकेची ‘प्लॅस्टिकबंदी’ जोरात, आठवडाभरात २५ लाखांचा दंड
- by Sanjay Pachouriya
- Mar 09, 2020
- 845 views
◆२३ हजार हजार ठिकाणी धाडी
◆ दोन हजार किलो माल जप्त
मुंबई (प्रतिनिधी) : प्लॅस्टिकविरोधात पालिकेने १ मार्चपासून जोरदार कारवाई सुरू केली असून आठवडाभरात तब्बल २५ लाख ३० हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत २३ हजार १८ ठिकाणी तपासणी करण्यात आली असून २०९८.९०२ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. आगामी काळातही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईसह राज्यभरात २३ जून २०१८ पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून बाजार, दुकाने-आस्थापना आणि अनुज्ञापन विभागातील ३१० निरीक्षकांच्या ‘ब्ल्यू स्कॉड’च्या माध्यमातून मुंबईत कारवाई सुरू आहे. तरीदेखील मुंबईत अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांसारख्या प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार मे २०२० पर्यंत महाराष्ट्र ‘सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिकमुक्त’ करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.
अशी होतेय कारवाई
प्रतिबंधित प्लॅस्टिकमध्ये हँडल असलेल्या व नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, एकदाच वापरल्या जाणार्या ताट, कप, प्लेट्स, ग्लास, चमचे, पाऊच, हॉटेलमध्ये अन्न-द्रव पदार्थ पॅकेजिंगसाठीच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. असे प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार दंड, दुसर्या गुन्ह्यासाठी दहा हजार आणि तिसर्या गुन्ह्यासाठी २५ हजारांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे.
अशी झाली कारवाई
दिनांक तपासणी जप्त प्लॅस्टिक दंड
●. १, २ मार्च ४०८१ १०२८.०९७ किलो. ३ लाख ७५ हजार
● ३ मार्च ५६०९ ४०८.००० किलो. ६ लाख ६६ हजार
● ४ मार्च ४०२२ २७१.३९० किलो. ५ लाख ३५ हजार
● ५ मार्च २१०७ १३२.४३५ किलो. १ लाख ५० हजार
● ६ मार्च ६८०९ २०८.४८० किलो. ७ लाख ४० हजार
● ७ मार्च ३९० ५०.५०० किलो. ७० हजार
एकूण २३०१८ २०९८.९०२ किलो. २५ लाख ३० हजार
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम