शौचालये बांधणीच्या प्रस्तावातील तफावतीवरून स्थायी समितीत सदस्य आक्रमक
- by Sanjay Pachouriya
- Mar 05, 2020
- 375 views
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील अनेक वार्डात शौचालये बांधण्याचे प्रस्ताव स्थायी समितीत आल्यानंतर त्याच्या मंजुरी अगोदर नगरसेवकांनी प्रस्तावातील किंमतीच्या तफावतीवरून प्रशासनाला जाब विचारत त्यांना धारेवर धरले. अखेर पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हे प्रस्ताव मंजूर केले. परंतु सदस्यांना प्रशासनाने लिखीत माहिती दयावी आणि त्यांच्या शंकाचे निरसन करावे अशा आशयाचे निर्देश दिले.
भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावातील त्रुटी आणि किंमतीतील तफावती सांगुन पालिका प्रशासन कशी दिशाभूल करत आहे हे निर्दशनास आणून दिले. दोन शौचालयांसाठी ८ लाख आणि दहा शौचालयासाठी पंधरा लाख असा खर्च दाखविण्यात आला आहे हे त्यांनी प्रशासनाच्या निर्दशनास आणून देत सोळा आसनांच्या शौचालयांवर किती खर्च केला ते प्रशासनाने समितीला स्पष्टीकरण दयावे अशी मागणी केली.जोपर्यंत संपूर्ण विवरण मिळत नाही तो पर्यंत हे प्रस्ताव राखून ठेवावेत अशी त्यांनी मागणी केली.तर शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी तत्कालीन आयुकत आणि माजी मुख्यमंत्र्यांना इ टेडरिंग हवे होेते मग आता कशाला ओरड करता असा सवाल करून त्यांनी आपल्या विभागातील शौचालयांची अवस्था किती बिकट आहे त्याची माहिती दिली.भाजपाचे नगरसेवक अॅड.मकरंद नार्वेकर यांनी कायदयाच्या दृष्टीकोनातून असे प्रस्ताव मंजूरच होउ शकत नाहीत तर समितीत आणता कशाला ? असा प्रश्न विचारून स्थायी समितीच्या डोळयात धुळफेक करून असे प्रस्ताव मंजूर करून घेतात यावर आक्षेप घेतला.तर आयुकतांनी ६९ के च्या कायदयाचा वापर कमीत कमी होईल असे सांगितले होते पण त्याचा गैरवापर होत असल्याचे नार्वेकर यांनी सांगून या प्रस्तावाला विरोध केला.काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी जनतेच्या जिव्हाळयाचे प्रस्ताव स्थायी समितीत आणतांना ते अभ्यास करून आणले जावेत असे मत मांडले आणि प्रशासनाने यापूर्वी घडलेल्या घटनांतून बोध घ्यावा अशी मागणी केली.नगरसेवकांचा सन्मान करत नागरिकांच्या हितांचे प्रस्ताव मंजुर झाले पाहिजेत असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मत मांडत ६९ के चा वापर करतांना काळजी घ्यायला हवी असे मत मांडले.भाजपाचे नगरसेवक विदयार्थी सिंह यांनी ठेकेदार शौचालयांच्या निर्मीतीत घोटाळा करत असल्याचे सांगून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.नागरिकांच्या हितासाठी आपण हे प्रस्ताव मंजूर करत आहे. परंतु ज्या नगरसेवकांनी शंका उपस्थीत केल्या आहेत त्यांना अतिरिकत आयुकत सुरेश काकाणी यांनी खातेप्रमुखांना सांगून लिखीत माहिती दयावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम