दिल्ली हिंसाचारानंतर आता मुंबईतही कलम १४४ लागू

९ मार्चपर्यंत रॅली, आंदोलन, आतिशबाजी यांवर बंदी घालण्यात आली आहे

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुंबईत ९ मार्चपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. यादरम्यान एका जागेवर ४ ते ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. तर ९ मार्चपर्यंत रॅली, आंदोलन, आतिशबाजी यांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज मुंबई पोलिसांनी यासंदर्भात घोषणा केली.

दिल्लीतील शाहीन बाग परिसरात जमावबंदी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसीच्या निषेधार्थ देशाची राजधानी दिल्लीच्या शाहीन बाग भागात दोन महिन्यांहून अधिक काळापासून लोक आंदोलन करत आहेत. दरम्यान, हिंदू सेनेनं शाहीन बागेत प्रतिआंदोलनाची घोषणा केली होती. ही घोषणा २९ फेब्रुवारी रोजी मागे घेण्यात आली. असं असूनही, लोक एकाच ठिकाणी पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून दिल्ली पोलिसांनी खबरदारीसाठी  कलम १४४ लागू केला आहे. शाहीन बागच्या निदर्शकांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराविरोधात १ मार्च रोजी शांतता मोर्चाची घोषणा केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आला आहेत. शांतता कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं उद्दीष्ट आहे. कोणत्याही अनपेक्षित घटनेसाठी पोलिसांनी ही तयारी केली आहे, असे दिल्ली पोलीस सहआयुक्त डी.सी. श्रीवास्तव म्हणाले.

संबंधित पोस्ट