CM उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर पिस्तुलासह तरुणाला अटक

इर्शाद खान असं त्याचं नाव असून त्याच्याकडे एक पिस्तुल सापडल्याने खळबळ उडालीय. हा तरुण दरोड्याच्या उद्देशाने बांद्र्याच्या कलानगरमध्ये आला होता.

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात एका तरुणाला अटक करण्यात आलीय. इर्शाद खान असं त्याचं नाव असून त्याच्याकडे एक पिस्तुल सापडल्याने खळबळ उडालीय. हा तरुण दरोड्याच्या उद्देशाने बांद्र्याच्या कलानगरमध्ये आला होता. मातोश्री बंगल्याच्या परिसरात तो आला होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती दिली जात आहे. कलानगच्या परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही जण येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर युनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा परिसर पिंजून काढला. त्यावेळी त्यांना इर्शाद खान संशयास्पद फिरताना आढळून आला. तो मातोश्रीजवळ १०० मिटर परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. तो एवढ्या सुरक्षीत भागात आला कसा आणि त्याच्याजवळ पिस्तुल आलं कुठून याचा तपास पोलीस करत आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे वर्षा या शासकिय निवासस्थानी न राहता मातोश्रीवर राहत आहेत. मातोश्री हे शक्तिस्थान असल्याने ते सोडणं  शक्य नसल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. 'मातोश्री' ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असल्याने इथे कायम कडक सुरक्षा व्यवस्था असते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

अशा हाय सेक्युरीटी झोनमध्ये हा दरोडेखोर कसा आला? दरोड्यासाठी त्याचं टार्गेट कुठलं होतं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इर्शादवर आधीही अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत अशी माहितीही दिली जात आहे. या घटनेनंतर मातोश्रीच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेला आणखी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट