नामांकित कंपनीच्या नावे बनावट बूटविक्री

दोन पुरवठादारांसह सहा जणांना अटक ३४ लाखांचे बूट आणि चपला जप्त

मुंबई.(प्रतिनिधी) : ब्रँडेड वस्तू वापरण्याचे तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. या वस्तू कमी दरामध्ये उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य त्या घेण्यासाठी गर्दी करतात. याची कल्पना असल्याने प्युमा तसेच इतर नामांकित कंपनांच्या नावे बनावट चपला आणि बुटांची विक्री करून लोकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेट गुन्हे शाखेने उघडकीस आणले. कुर्ला परिसरातील सहा दुकानांमधून छापा टाकून ३४ लाखांचे बनावट बूट आणि चपला हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी दोन पुरवठादारांसह पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

कुर्ला पश्चिमेकडील किशोर फुटवेअर, सचिन फुटवेअर, सुफियान फुटवेअर, साजिद फुटवेअर, योगेश फुटवेअर आणि सुनील फुटवेअर या दुकानांतून प्युमा तसेच इतर नामांकित कंपन्यांचे लोगो वापरून बूट आणि चपला विकल्याली जात असल्याची तक्रार प्युमा कंपनीच्या वतीने करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत लोकांची फसवणूक करणाऱ्या या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ५ चे प्रभारी जगदीश साईल, निरीक्षक योगेश चव्हाण, सहायक निरीक्षक सुरेखा जौंजाळ, महेंद्र पाटील, उपनिरीक्षक महेश बंडगर, हिंदुराव चिंचोलकर यांच्यासह पोलिसांची पथके तयार करण्यात आली. या दुकानांमध्ये एकाच वेळी छापा टाकून २४ लाखांचे बनावट बूट आणि चपला हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांनी याप्रकरणात अल्तमाश शेख, योगेश जैस्वाल, सचिन कानडे, स्वप्नील गुंठले, साजिद शेख, किशोर अहिरे, सचिन कानडे या सहा विक्रेत्यांना अटक केली. चौकशीमध्ये हे सहा जण मशिद बंदर येथील दोन पुरवठादारांकडून हा मुद्देमाल घेत असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून आणखी दहा लाखांचे बनावट बूट आणि चपला जप्त केल्या. बनावट वस्तू विक्री करणारी मोठी साखळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

  • shoes

  • shoes1



रिपोर्टर

संबंधित पोस्ट