
मुंबईत संपत्तीसाठी ७० वर्षीय आईला विवस्त्र करुन मुलीने केली मारहाण
या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
- by Sanjay Pachouriya
- Feb 25, 2020
- 1288 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कांदिवली भागात ७० वर्षीय आईला तिच्या मुलीने संपत्तीसाठी विवस्त्र करुन मारहाण केल्याचा धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार घडला आहे. पोटच्या मुलीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार ७० वर्षीय वृद्धेने समता नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि देखभाल कायदा २००७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुलगी उपाशी ठेवते, विविस्त्र करुन मारहाण करते असा आरोप या वृद्ध महिलेने तक्रारीत केला आहे.
पीडित ७० वर्षीय वृद्ध महिला या लोखंडवाला येथे वास्तव्यास आहेत. त्या एमटीएनलमध्ये नोकरीला होत्या. त्यांचे पती आयकर विभागात अधिकारी होते. या दोघांना पाच मुली असून सर्वांची लग्नं झाली आहेत. त्यांच्या दोन मुली विदेशात, दोन मुंबईत आणि एक मुलगी त्यांच्यासोबत राहते. त्यांच्या जवळ राहणाऱ्या मुलीने गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा छळ सुरु केला आहे. घरातील संपत्तीवरुन या दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर आपल्याला वारंवार मारहाण करण्यात आल्याचं या पीडित वृद्ध महिलेने म्हटलं आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीत डावा हात फ्रॅक्चर झाला होता असेही या महिलेने म्हटले आहे. काही दिवस शांततेत गेले त्यामुळे मुलीने संपत्तीचा विषय सोडून दिला असे वाटले म्हणून यापूर्वी तक्रार करण्यासाठी आले नाही असे पीडितेने म्हटले आहे.
दरम्यान वाद शांत झाला होता मात्र तो काही काळासाठीच होता. मुलीने आता मला पुन्हा एकदा विवस्त्र करुन मारहाण करण्यास आणि उपाशी ठेवण्यास सुरुवात केली आहे असं या पीडित वृद्ध महिलेने म्हटलं आहे. एवढंच नाही तर मुलीने डेबिट कार्ड, आधार कार्ड, बँकांचे चेकबुक काढून घेतले. मोबाईलही काढून घेतला अशीही तक्रार या महिलेने समता नगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम