
धक्कादायक: मोबाइल चोराने प्रवाशाला ट्रेन बाहेर खेचलं, अंधेरीतील घटना
मुंबईत मोबाइल फोन चोरांची मजल मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यांच्यावर पोलिसांचा अजिबात वचक राहिलेला नाही.
- by Reporter
- Feb 17, 2020
- 1152 views
मुंबई (प्रतिनिधी) : मोबाइल फोन चोरांची मजल मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यांच्यावर पोलिसांचा अजिबात वचक राहिलेला नाही. रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडणाऱ्या मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये आतापर्यंत अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना शुक्रवारी अंधेरी रेल्वे स्थानकात घडली.
मोबाइल चोराने एका ३२ वर्षीय तरुणाला धावत्या ट्रेनमधून बाहेर खेचले. हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. संतोष कुमार मौर्य असे या जखमी तरुणाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी मोबाइल चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संतोष कुमार फार्मासिस्ट असून तो नानावटी रुग्णालयात नोकरीला आहे.
नेमकं काय घडलं?
संतोष कुमार मौर्यला विलेपार्ल्याच्या नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नालासोपारा येथे राहणारा संतोष कुमार अंधेरी येथे फास्ट लोकलमधून उतरला व विलेपार्ल्याला जाण्यासाठी स्लो लोकल प़कडली. “लोकलचा डब्बा पूर्ण भरलेला होता. मी दोन्ही हातांनी वरचे हँडल पकडलेले होते. तितक्यात डब्ब्यातील एक प्रवासी मोबाइल चोर म्हणून ओरडला. मी लगेच माझे खिस्से तपासले. माझा मोबाइल गायब होता. मी लगेच त्या चोराच्या कॉलरला पकडले. पण त्याने धावत्या लोकलमधून बाहेर उडी मारली व सोबत मलाही खेचले. माझा तोंड प्लॅटफॉर्मवर आपटले” असे संतोष कुमारने सांगितले.
मोबाइल चोर पळत असताना सहप्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील अन्य प्रवाशांनी पाठलाग करुन त्याला पकडले.
रिपोर्टर