टायगर मेमनचा विश्वासू साथीदार अटकेत
डोंगरीला वास्तव्यास असलेला माजीद बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याचा विश्वासू साथीदार होता.
- by Reporter
- Feb 11, 2020
- 526 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुनाफ हलारी अब्दुल माजीद या आरोपीला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.
जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात या पथकाने पाकिस्तानातून समुद्रामार्गे गुजरातच्या मांडवी किनाऱ्यावर पाठवण्यात आलेल्या हेरॉईनचा साठा हस्तगत केला. या कारवाईत पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान कराची येथील हाजी हसन याने हेरॉईनचा साठा पाठवल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली. गुजरात एटीएसने केलेल्या तांत्रिक तपासातून हाजी हसन सातत्याने संपर्कात असलेली व्यक्ती माजीद आहे, हे स्पष्ट झाले.
डोंगरीला वास्तव्यास असलेला माजीद बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याचा विश्वासू साथीदार होता. १९९२मध्ये माजीदने मित्राकडून ७० हजार रुपये उसने घेऊन तीन नव्या स्कूटर विकत घेतल्या आणि मेमनच्या ताब्यात दिल्या. या स्कूटरमध्ये स्फोटके दडवून विविध ठिकाणी उभ्या केल्या गेल्या. झव्हेरी बाजार येथे झालेल्या शक्तिशाली स्फोटात माजीदने विकत घेतलेल्या एका स्कूटरचा समावेश होता. बॉम्बस्फोट मालिकेनंतर माजीद पसार झाला. मेमनने पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने माजीदसाठी बनावट पारपत्र तयार करून घेतले. त्या पारपत्राआधारे माजीदने केनियातील नैरोबी येथे मॅग्नम आफ्रिका या नावे व्यापार सुरू केला.
कालांतराने मेमनच्या सांगण्यावरून तो धान्य विशेषत: तांदूळ आयात-निर्यात करण्याच्या व्यवसायात उतरला. या व्यवसायाआड भारतात अमली पदार्थ, स्फोटकांची तस्करी करणे सहज-सोपे ठरावे, हा उद्देश होता, अशी माहिती गुजरात एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली
रिपोर्टर