
कंडक्टरविरहित बेस्ट बसेस म्हणजे जीवाशी खेळ: बेस्ट कर्मचारी संघटनेचा आरोप
बेस्टच्या कंडक्टर नसलेल्या बसेस मुंबईकर प्रवाशांच्या फारशा पसंतीस उतरल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची सेवा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. बेस्टने काल (गुरुवार) एकूण ३८ मार्गांवरील बसेसमधून कंडक्टर काढून टाकले आहेत. या बरोबरच अशा बसेसचा मागील दरवाजे काठ्या आणि रश्शीने बांधून बंद केले आहेत.
- by Reporter
- Feb 07, 2020
- 726 views
मुंबई (प्रतिनिधी): बेस्टच्या कंडक्टर नसलेल्या बसेस मुंबईकर प्रवाशांच्या फारशा पसंतीस उतरल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची सेवा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. बेस्टने काल (गुरुवार) एकूण ३८ मार्गांवरील बसेसमधून कंडक्टर काढून टाकले आहेत. या बरोबरच अशा बसेसचा मागील दरवाजे काठ्या आणि रश्शीने बांधून बंद केले आहेत.
आतापर्यंत ३६ मार्गांवरील एकूण ३०० वातानुकूलित बसेस आणि ४५ मार्गांवरील २२५ साध्या बसेसमधून कंडक्टर काढून टाकण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बेस्टने कंडक्टर नसलेल्या बसेसचा प्रयोग सुरू केला होता.
कंडक्टरविहरित वातानुकूलित बसेसच्या प्रस्थान स्थानकातूनच तिकिट दिले जाते. मधल्या कोणत्याही थांब्यावर प्रवाशांना बस पकडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि, कर्मचाऱ्यांच्या संघटनेने बेस्टने उचललेल्या या पावलाचा कडाडून विरोध केला आहे. या प्रकरणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. बेस्टने हा सुरू केलेला प्रयोग म्हणजे खासगीकरणाकडे केलेली वाटचाल असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. तथापि, इंडस्ट्रियल कोर्टाने अशा प्रकारच्या बस चालण्याची परवानगी बेस्टला देऊ केली आहे.
अशा सेवेमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटते आहे. म्हणूनच अशा बसेस म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असे कर्मचारी म्हणत आहेत. अशा प्रकारे बसचा मागील दरवाजा काठ्या आणि रश्शीने बांधून बंद करणे घातक असून या मुळे प्रवाशांचा पडून मृत्यू होण्याचा धोका असल्याचे बेस्ट कामगार संघटनेचे नेते जगनारायण कहार यांनी म्हटले आहे.
कंडक्टरविरहित बसेसचे मागील दरवाजे तात्पुरत्या स्वरुपात काठ्या आणि रश्शीने बंद करण्यात आल्याची माहिती बेस्टचे प्रवक्ता मनोज वराडे यांनी म्हटले आहे. लवकरच मागील दरवाजा लोखंडी पत्रा लावून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आतापर्यंत बेस्टने एकूण ३५ बसेसना लोखंडी पत्रे लावून मागील दरवाजे बंद केले असून येत्या एक-दोन दिवसांमध्ये उर्वरित सर्व बसेसचे दरवाजे देखील कायमस्वरूपी लोखंडी पत्र्याने बंद केले जातील, असेही वराडे म्हणाले
रिपोर्टर