क्षुल्लक वादातून महिलेला जाळले

पनवेलमधील खळबळजनक प्रकार

पनवेल (प्रतिनिधी): दुंदरे गावात तीन दिवसांपूर्वी एका महिलेला तिच्या घरात जाळून तिने गळफास घेतल्याचे भासवण्याचा गुन्हा गुरुवारी उघडकीस आला. या गुन्ह्य़ातील पाच संशयित आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी तीन पथके स्थापन केली आहेत.

मृत महिलेचे नाव शारदा माळी असे आहे. तिच्या कुटुंबीयांची व्यथा माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा  घटनास्थळ गाठले. त्या आधी नवीन पनवेल पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देऊन ते बंद करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र प्रसारमाध्यमांवर वृत्त प्रसारित होताच पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आणि आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अलका पाटील, जनाबाई दवणे, गोपाळ पाटील, हनुमान पाटील, श्रुती पाटील या तिच्या शेजाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून ते फरार आहेत.

गेल्या आठवडय़ात शारदा यांच्या माहेरहून त्यांना ५० हजार रुपये मिळाले होते. त्यातून त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र केले होते. ते गहाळ झाल्याने त्यांनी त्यांच्या घरी ये-जा असलेल्या शेजारच्या व्यक्तींवर संशय घेतला. त्यावरून शेजाऱ्यांशी त्यांचा वादही झाला. त्यानंतर शारदा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. शेजाऱ्यांनी शारदा यांना जाळल्याचा संशय कुटुंबीयांनी केला. शारदा यांचे पती अपंग आहेत. ते गवंडीकाम करतात.

नवीन पनवेल पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर अधिक तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आधी दुर्लक्ष मग दखल..

या प्रकरणी नवीन पनवेल पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी संशयित आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंदवले होते. मात्र भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधल्यावर आणि भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी ते गांभीर्याने घेतले. गुरुवारी रात्री पोलिसांनी शारदा यांची हत्या झाल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. वैद्यकीय अहवालात शारदा यांच्या शरीरावर जळण्याचे व्रण आणि गळा आवळल्याच्या खुणा होत्या.

संबंधित पोस्ट