तर आरपीएफ देणार महिलांना ‘होम ड्रॉप’

महिलांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

मुंबई (प्रतिनिधी) : कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी निरनिराळी पावलं उचलण्यात येत आहे. यानुसार आता आरपीएफचे जवान आवश्यकता असल्यास संबंधित महिलेला घरापर्यंत सोडण्यासाठी येणार आहेत. नागपूरनंतर मुंबईत मध्य रेल्वेच्या पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री उशिरा आवश्यकता भासल्यास पोलीस होम ड्रॉप देणार असल्याची सुविधा नागपूरमध्ये सुरू करण्यात आली आहे. याच धर्तीवर आता मुंबईत मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यकता भासल्यास होम ड्रॉपची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आरपीएफचे काही जवान तैनात करण्यात येणार आहेत. हे जवान महिलांना सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत ही सुविधा मिळणार आहे. यासाठी १८२ हा क्रमांक सुरू करण्यात आला असून यावर कॉल करून महिलांना आरपीएफच्या जवानांची मदत घेता येईल.

रात्रीच्या सुमारास घडणारे अनुचित प्रकार आणि चोरीच्या प्रकरणांपासून संरक्षण मिळावं, यासाठी ही विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनापासून महिलांना आवश्यकता भासल्यास आरपीएफच्या जवानांची मदत घेता येणार आहे. महाराष्ट्र संरक्षण दल आणि आरपीएफच्या संयुक्त विद्यमानं ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट