खाऊसोबत प्लॅस्टिक खेळणी असतील तर कारवाई

लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या चवीचे वेफर्स, मसालेदार पदार्थ, चटपटीत पॉपकॉर्न्स यांच्या पाकिटांमध्ये प्लास्टिकची छोटी खेळणी असतात. मात्र प्लास्टिक हा खाण्यायोग्य पदार्थ नाही, त्यामुळे अशी खेळणी खाद्यपदार्थांमध्ये आढळल्यास उत्पादकांवर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे


मुंबई(प्रतिनिधी): लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या चवीचे वेफर्स, मसालेदार पदार्थ, चटपटीत पॉपकॉर्न्स यांच्या पाकिटांमध्ये प्लास्टिकची छोटी खेळणी असतात. मात्र प्लास्टिक हा खाण्यायोग्य पदार्थ नाही, त्यामुळे अशी खेळणी खाद्यपदार्थांमध्ये आढळल्यास उत्पादकांवर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

स्वस्तात मिळणारे मात्र चवीला चटपटीत असणारे हे पदार्थ खाण्याचा हट्ट मुले धरतात. त्यामागे या पदार्थाच्या चवीसह त्यामध्ये असलेली प्लास्टिकची छोटी खेळणी हेदेखील एक महत्त्वाचे कारण असते. लहान मुलांना हातामध्ये खाऊ दिला की त्यांच्याकडून अजाणतेपणे हे प्लास्टिकची खेळणी तोंडात टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाकिटांमध्ये

असलेली खेळणी आकाराने अतिशय छोटी असतात. मात्र प्लास्टिक आणि खाण्याचा पदार्थ एकत्र देणे हे आरोग्यासाठी हितकारक नाही. त्यातून अजारांची लागण होऊ शकते, त्यामुळे अशा प्रकारच्या उत्पादनांची तक्रार एफडीएकडे नोंदवली तर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे एफडीएकचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी 'मटा'ला सांगितले.

नागपूरमध्ये अशा प्रकारे विक्री होणाऱ्या पदार्थांबद्दल तक्रार आली होती, या तक्रारीची दखल घेत तेथील अधिकाऱ्यांनी धाड टाकून हा माल जप्त केला. या घटनेपासून बोध घेत अशा प्रकारे मुलांना आकर्षित करण्यासाठी ही पद्धत वापरण्यावरही आपसूक चाप लागला. मुंबईसह अनेक ठिकाणी खाऊच्या पाकिटांतून हे आमिष दाखवले जाते. हे पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांना पोटदुखीसारखा त्रास उद्भवत असल्याची तक्रारही पालकांकडून अनेकदा येते.                                                                                                                                                                                                                 विकत घेतल्या जाणाऱ्या खाण्याच्या पदार्थांच्या गुणवत्तेबद्दलचा आग्रह कायम अन्न व औषध प्रशासनाकडून धरला जातो. त्यातून 'इट राईट'सारखी मोहीमही आकारास आली आहे.  शहरातील शाळांच्या कॅन्टीनमधूनही फास्ट फूडला पोषक आहाराचा पर्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रय़त्न सुरू आहे. त्यामुळे विविध ठिकाणी सहज उपलब्ध असलेल्या प्लास्टिक खेळण्यांचा समावेश असणाऱ्या या खाऊच्या दर्जाबद्दल पालकांनीही सजग असायला हवे, असे मत केकरे यांनी मांडले. त्यामुळे स्वस्तात असे पदार्थ मिळत असतील व ते एफडीएच्या निदर्शनास आणून दिले तर त्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.                                                                                                                                

संबंधित पोस्ट