गॅस गीझरमुळे गुदमरून मुलीचा मृत्यू

गॅस गीझरमधून पाणी गरम होताना बाथरूममध्ये हवा खेळती नसल्याने कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू तयार होतो.

मुंबई(प्रतिनिधी):  आंघोळ करताना बाथरूममधील गॅस गीझरमधून वायुगळती झाल्याने एका १५ वर्षीय मुलीचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गोराई येथे घडली. ध्रुवी गोहिल असे मुलीचे नाव आहे. कॉर्बन मोनॉक्साइडच्या संपर्कात आल्यामुळे ध्रुवीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ध्रुवी ही कुटुंबासह गोराई येथे राहत होती. ती नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गॅस गीझरमधून पाणी गरम करत होती. आईला आंघोळीला जाते, असे सांगून ती बाथरूममध्ये गेली. मात्र आंघोळीला जाऊन एक तास उलटला तरी ती बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला.

आतमधून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. या वेळी ध्रुवी बेशुद्धावस्थेत पडली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. प्रकृती बिकट असल्याने तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती ध्रुवीच्या कुटुंबीयांनी दिली.

गॅस गीझरमधून पाणी गरम होताना बाथरूममध्ये हवा खेळती नसल्याने कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू तयार होतो. या प्रकरणातही हेच झाले. परिणामी या वायूच्या संपर्कात आल्यामुळे ध्रुवी बेशुद्ध पडली. तसेच बेशुद्धावस्थेत तिचा पाय गरम पाण्याच्या नळाखाली आला होता. त्यामुळे तिचा पायही भाजला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. तसेच ‘स्नागृहामध्ये गॅस गीझर लावू नका,’ असे आवाहन ध्रुवीच्या कुटुंबीयांनी केले आहे.

संबंधित पोस्ट