इंजिनीअरिंगला अवकळा

इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअरचा दबदबा आता दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटू लागली आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी देशभरात घेण्यात

प्रतिनिधी मुंबई  इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअरचा दबदबा आता दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटू लागली आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी देशभरात घेण्यात येणाऱ्या 'जेईई' या प्रवेश परीक्षेसाठी यंदा २०१३च्या तुलनेत तब्बल चार लाखांनी अर्जांची संख्या घटली आहे, तर राज्यातही यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या तब्बल ४५ हजारांनी कमी होती.

ऑटोमेशनमुळे नोकऱ्यांमध्ये होणारी कपात आणि नोकरीस पूरक नसलेला अभ्यासक्रम यांमुळे देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधील जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातही हे प्रमाण वाढत असून, या शैक्षणिक वर्षात सुमारे ३८ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिक्त जागांचे प्रमाण कमी करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने यंदा विशेष प्रयत्न केले होते. तसेच कमी प्रवेश असलेली काही कॉलेजे बंद करण्यात आली होती. तरीही विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. तसेच देश पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतही ही संख्या घटत असल्याचे समोर येत आहे.

सन २०१२पासून देशात 'जेईई' लागू करण्यात आली. मात्र त्यावर्षी सक्ती नव्हती. यानंतर २०१३पासून देशभरात 'जेईई'ची सक्ती करण्यात आली. यावेळेस देशभरातून तब्बल १२ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यानंतर २०१४मध्ये ही विद्यार्थी संख्या वाढून १३ लाख ५६ हजार ८०५पर्यंत पोहोचली. मात्र यानंतर अनेक राज्यांमध्ये त्यांची स्वत:ची प्रवेश परीक्षा सुरू करण्यात आली. मात्र देशातील इतर राज्यांत तसेच केंद्रीय इंजिनीअरिंग कॉलेजेसशिवाय 'आयआयटी', 'एनआयटी'सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 'जेईई' हीच परीक्षा देणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही ही संख्या २०१४पासून सतत घटत गेली. २०२०मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ती तब्बल चाडेचार लाखांनी घसरून नऊ लाख २१ हजार २६१वर आली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संबंधित पोस्ट