नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ; टोळी अटकेत

अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीनं पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंबई(प्रतिनिधी):काही नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट १२ नं ही कारवाई केली आहे. या कारवाईत १३९ लिटर भेसळयुक्त दुध आणि त्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीनं पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईतील गोरेगाव परिसरात काही जण नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीद्वारे पोलिसांनी पथकं तयार केली. दरम्यान, या पथकानं गोरेगावमधील भगतसिंग नगर आणि लिंक रोड परिसरात छापे टाकले. यादरम्यान भेसळयुक्त दुध आणि त्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं. तसंच या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून यात महिलेचाही समावेश आहे. तर दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईतही दोघांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या व्यक्ती एका कंपनीच्या दुधाच्या पिशव्या कापून त्यातील काही दूध काढून घेत असत. तसंच त्यात पुन्हा दुषित पाणी मिसळत होते. भेसळ केल्यानंतर ते मेणबत्तीच्या साहाय्यानं पिशवी सील करून ते पुन्हा विकत असत. या प्रकरणी नामांकित कंपनीच्या बनावट पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट