बेकायदा पार्किंगचा दंड कमी होणार

नगरसेवकांचा विरोध कायम

मुंबई(प्रतिनिधी): बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी लागू केलेला दहा हजारांचा दंड आता कमी केला जाणार आहे. पार्किंगच्या दराच्या चाळीस पट तर वर्दळीच्या मार्गावर दुप्पट दर आकारले जाणार आहेत. प्रशासनाने तसे सुधारित परिपत्रक जाहीर केले आहे. मात्र, नगरसेवकांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पार्किंगवरुन प्रशासन आणि नगरसेवकांत जुंपण्याची शक्यता आहे.
मुंबईत बेकायदा पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या धोरणानुसार बेकायदा पार्किंग करणार्‍यांवर पाच ते तेवीस हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत होता. पालिकेच्या पार्किंगपासून ५०० मीटरच्या आत बेकायदा पार्किंग केल्यास हा दंड वसूल केला जात आहे. मात्र सर्वसामान्यांना ही मोठी रक्कम भरण्यास अनेक वेळा विरोध होऊन वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. अनेक सोसायट्यांजवळ ही पार्किंग असल्याने रहिवाशांचाही या धोरणाला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दहा हजारांचा दंड कमी करण्याचा निर्णय घेतला. तसे सुधारित परिपत्रक जाहीर केले आहे. वाहनतळाबाहेर बेकायदा केल्यास चाळीस पट दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम कमी केल्यास वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, वर्दळीचे मार्ग असलेल्या एम.के रोड, एस.व्हि रोड, एलबिएस मार्ग, न्यु लिंक रोड या चार महत्वाच्या रस्त्यांसाठी अनधिकृत पार्किंगसाठी मजबूत दंड आकारला जाणार आहे. नगरसेवकांनी या परिपत्रकाला विरोध दर्शवला आहे.

निवडणूक काळावधीत प्रशासनाने पार्किंग पॉलिसी ठरवली. नगरसेवकांनी दर कमी करण्याची पत्र दिली होती. मुंबईकरांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत होता. सुधारित दरांबाबत पाहणी केली जाईल. पार्किंग पॉलिसीमुळे मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये. यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

पार्किंगच्या दंडाला लोकांचा विरोधात आहे. प्रशासनाकडे याप्रकरणी वारंवार तक्रारी केल्या. पालिकेचे सुधारित परिपत्रकात लोकांशी दिशाभूल करणारी आहे. याविरोधात स्थायी समिती आणि येत्या महासभेत विरोध करु. - रवी राजा, महापालिका विरोधी पक्षनेते  

चार महत्वाचे रस्ते वगळता इतर मुंबईसाठीचे दर
आधीचा दंड आणि आताचा दंड
पार्किंग पॉलिसीतील नव्या नियमांनुसार
दुचाकी
आधीचा दंड - ५ हजार
सुधारीत दंड- १८००
 
तीन-चार चाकी
आधीचा दर - १० हजार
सुधारीत दंड - ४ हजार

ऑटो, टँक्सी
आधीचा दर- ८ हजार
सुधारीत दर- ४ हजार

सार्वजनिक वाहतूक बस
आधीचा दर- ११ हजार
सुधारित दर- ७ हजार

ट्रक
आधीचा दर- १५ हजार
सुधारित दर - १० हजार

एम.के रोड, एस.व्हि रोड, एलबिएस मार्ग, न्यु लिंक रोड या चार महत्वाच्या रस्त्यांसाठीचा दर
दुचाकी
आधीचा दंड - ५ हजार
सुधारीत दंड - ३ हजार ४००

तीन-चार चाकी
आधीचा दर - १० हजार
सुधारीत दंड - ८ हजार

ऑटो, टँक्सी
आधीचा दर - ८ हजार
सुधारीत दर - ४ हजार

सार्वजनिक वाहतूक बस
आधीचा दर - १४ हजार
सुधारित दर - ७ हजार

ट्रक
आधीचा दर - १९ हजार ८००
सुधारित दर - १० हजार

संबंधित पोस्ट