मनसेचा झेंडा प्रसिद्ध होण्याआधीच वाद पेटला, संभाजी ब्रिगेडने केला तीव्र विरोध
राजकारणात चढउतार होत असतात. परंतु. मतांसाठी जाती धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुद्धा सरड्यासारखे सतत बदलला, असे रंग राजकारणात बदलता येत नाही.
- by Reporter
- Jan 07, 2020
- 1296 views
मुंबई(प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर नव्या वर्षात मनसेचे नव्या जोमाने कामाला लागली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाप्रकारे पक्षाचं मेकओव्हर करण्याच्या तयारीत आहे. यासाठीच मनसेची ओळख असलेला झेंडाही बदलण्यात येणार आहे. पंरतु, हा झेंडा प्रसिद्ध होण्याआधीच वाद सुरू झाला आहे. संभाजी ब्रिगेडने मनसेच्या या नव्या झेंड्याला विरोध केला आहे.
राजकारणात चढउतार होत असतात. परंतु. मतांसाठी जाती धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुद्धा सरड्यासारखे सतत बदलला, असे रंग राजकारणात बदलता येत नाही. मनसेने आता नवीन भगवा झेंडा निर्माण करून त्यावर 'राजमुद्रा' छापलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 'राजमुद्रा' ही राजकारण करण्याचे साधन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे.
तसंच राज्याचे निवडणूक आयोग, छत्रपती यांचे वंशज आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्या विरोधात आणि तक्रार करणार असल्याचंही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केलं.
आम्ही भारतीय संविधान आणि लोकशाही मानणारे व्यक्ती आहोत. परंतु, 'राजमुद्रा' वापरणं हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. भगवा झेंडा हा समता, समता आणि बंधुतेचा प्रतीक असून तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज शांतीचे सुद्धा प्रतिक आहे. तेच त्यांनी स्वीकारावं, त्यांनी हिंदुत्वाची झालर पांघरू नये. पहिल्या मूळ झेंड्यात जातीचे रंग वापरले गेले? आता या जातीच्या रंगाचा मनसे करणार काय? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी विचारलाय.
असा असेल मनसेचा झेंडा?
सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.
23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन
दरम्यान, 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठ अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत.
राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.
आत्तापर्यंत मनसेच्या अजेंड्यावर मराठीच्या मुद्या अग्रभागी होता. आता त्याचसोबतच मनसे हिंदुत्वाचा मुद्दाही आक्रमकपणे लावू धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
रिपोर्टर