भाजपकडून सुडाचे राजकारण सुरू: शिखर बँकेशी संबंध नसतानाही निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांवर ईडी कडून गुन्हा दाखल

उद्या बारामती बंद! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिखर बँक घोटाळ्यात पवारांना गोवण्याचे जे कारस्थान शिजले आणि ईडी ने पवारांविरोधात जो गुन्हा दाखल केला त्याच्या निषेधार्थ आज बारामती बंद ठेवण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या इतर भागातही याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.

मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने सुडाचे राजकारण सुरू केले आहे. शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहून जळफळाट झालेल्या भाजपने शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांना गोवण्याचे कारस्थान रचले आहे. शरद पवार शिखर बँकेचे कधीही संचालक नसतानाही ईडी ने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या सूडाच्या राजकारणाची भाजपला विधानसभा निवडणुकीत फार मोठी किंमत चुकवावी लागेल असे लोक म्हणत आहेत. तर पवारांनी मात्र आपल्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याचे मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आघाडी सरकार सत्तेवर असताना शिखर बँकेत २५ हजार कोटींची घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. शिखर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने तोट्यात गेलेल्या सहकारी संस्था,सूतगिरण्या,साखर कारखाने यांना नियमबाह्य कर्ज वाटप केले होते. त्यामुळे शिखर बँक तोट्यात गेली असा चौकशी समित्यांचा अहवाल येताच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला. दरम्यान या घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी अण्णा हजारे आणि इतर काही लोक मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. तिथे या संपूर्ण प्रकरणावर बराच काळ सुनावणी होऊन न्यायालयाने आपला निकाल दिला. यात शिखर बँकेच्या तत्कालीन ७० संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामध्ये अजित पवार ,शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे मधुकर चौधरी, सेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपचे पांडुरंग फुंडकर आदी अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता. मात्र शरद पवारांचे कुठेही नाव नव्हते कारण शरद पवार या बँकेचे संचालक ही नव्हते आणि सभासद नव्हते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी जो महाराष्ट्रात दौरा केला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताच भाजपचे धाबे दणाणले. त्यातच शरद पवार यांनी आपल्या भाषणात मी कधीही तुरुंगात गेलो नाही असे म्हणून अमित शहा यांची खिल्ली उडवली होती, ती भाजपच्या जिव्हारी लागली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या ८३ पानी निकालाचा किस काढण्यात आला आणि त्यातील ६३ क्रमाकांच्या पानावर पवारांविषयी लिहले होते की हा घोटाळा होत असताना शरद पवारांना ठाऊक होते. पण ते हेतुपरस्पर गप्प राहिले. याचा अर्थ याचे पवारच सूत्रधार असावे असे प्रथम दर्शनी वाटते. अशी न्यायालयाने आपल्या निकालात जी टिप्पणी केली होती. तो धागा पकडून पवारांनाही यात गोवण्यात आले आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर मध्ये शरद पवारांचे नाव घातले. त्यामुळे ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र एन निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने हे सुडाचे राजकारण आहे अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. जो भाजपच्या विरोधात बोलेल त्याच्या भोवती ईडीच्या चौकशीचा फास आवळला जात आहे. चिदंबरम ,शिवशंकर ,राज ठाकरे आदी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवून भाजप सुडाचे राजकारण करीत असल्याची सर्वत्र भावना आहे.
 माझ्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळल्यानेच गुन्हा दाखल- शरद पवार
माझ्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर मी त्याचे स्वागत करतो. मी शिखर बँकेचा कधीच संचालक नव्हतो पण सहकारी संस्था अडचणीत असतांना त्यांना आर्थिक उभारी देणे हा काही गुन्हा नाही. पण त्यांना तो गुन्हा वाटतोय. माझ्या महाराष्ट्र दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून कदाचित त्यांनी हे पाऊल उचलले असेल.



 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट