
भगतसिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ
- by Adarsh Maharashtra
- Sep 05, 2019
- 1339 views
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. कोश्यारी हे १९ वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.
राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा. राम शिंदे, पदुम मंत्री महादेव जानकर, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, उत्तराखंडचे वन मंत्री एच.एस. रावत, कृषी मंत्री सुबोध उनियाल, राज्यमंत्री रेखा आर्य, राज्यमंत्री डॉ.दान सिंह रावत आदी उपस्थित होते.
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी श्री. कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले. राज्यपालांचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोश्यारी यांचा परिचय
राज्यपाल कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. त्यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी उत्तरांचल प्रदेश क्यू? आणि उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान या दोन पुस्तकांचे लेखन केले. श्री. कोश्यारी हे ३० ऑक्टोबर २००१ ते १ मार्च २००२ या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामे केली आहेत.
शपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकायुक्त न्या.एम.एल.तहिलियानी, सेवा हक्क चे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.शशिकला वंजारी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम