
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 25 रुसा प्रकल्पांचे डिजिटल लाँचिंग
- by Adarsh Maharashtra
- Feb 03, 2019
- 593 views
मुंबई: भारतीयांचे जीवन सुसह्य आणि सुखकर होण्यासाठी केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. राष्ट्रावर कोणतीही आपत्ती किंवा कठीण परिस्थिती ओढावल्यास तत्परतेने एकमेकांना मदतीचा हात देऊन आपल्याला लाभलेल्या संसाधनांची जपणूक करणे ही भारताच्या प्रगतशील मार्गाची शक्ती आहे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दुसऱ्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) या कार्यक्रमांतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 25 ‘रुसा’ अंतर्गत प्रकल्पांच्या डिजिटल लाँचिंगचा कार्यक्रम आज संपन्न झाला.या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये 200 महाविद्यालय, अंदाजे एक लाख विद्यार्थी डिजिटली, दोन कोटी पस्तीस लाख विद्यार्थी सोशल साईट्सद्वारा सहभागी झाले होते. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज येथे झालेल्या रुसा 2.0 प्रकल्पाच्या डिजिटल लाँचिंगच्या कार्यक्रमप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, झेवियर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेंद्र शिंदे, आदी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री म्हणाले की, आजच्या घडीला चीन आणि अमेरिकेनंतर भारत हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे स्टार्टअप असलेले राष्ट्र बनले आहे. मागील चार वर्षात भारतात पंधरा हजारहून अधिक स्टार्टअप निर्माण झाले आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून शहरासोबत ग्रामीण भाग तांत्रिकदृष्ट्या विकसित करण्याचा तसेच भारतातील तरुणांच्या नवकल्पनांना विचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रुसा कार्यरत आहे,रुसाच्या माध्यमातून जवळपास पावणेचारशे जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट शिक्षण संस्था सुरु करण्यात येत आहे.तसेच देशातील तरुण पिढीचा क्रीडा क्षेत्रात रस वाढावा तसेच क्रीडा रसिक निर्माण होण्यासाठी केंद्र सरकार ‘खेलो इंडिया’ सारखे कार्यक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
रुसा अंतर्गत 70 नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज, आर्ट ऑफ प्रोफेशनल कॉलेज, एक महिला विद्यापीठ, साठहून अधिक नवकल्पनांच्या उद्योगांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील चिखली येथील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा कोनशिला अनावरण समारंभ त्याचप्रमाणे नंदूरबार जिल्ह्यातील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा अनावरण समारंभ डिजिटल लाँचिंगद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे संपन्न झाला. त्याचप्रमाणे रुसा अंतर्गत महाराष्ट्राला स्वायत्तता मिळालेल्या खालील महाविद्यालयांचे डिजिटल लाँचिग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रधानमंत्र्यांनी विविध राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
नोकरदार नाही नोकरी देणारे बना
आजच्या स्पर्धात्मक युगात सर्व काही झपाट्याने बदलत आहे. केवळ पदवीधर असणे पुरेसे नाही . पदवी सोबत अंगी कौशल्य असणे ही काळाची गरज आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणाने तुम्ही स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देऊ शकता तसेच स्वतःला एक जबाबदार नागरिक म्हणून सिद्ध करू शकता असे श्री.तावडे यांनी यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी झेवियर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करून सुसंवाद साधला. यावेळी सेंट झेवियर्स महाविद्यालयातील उद्योजकता सेल आणि कौशल्य केंद्राचे उद्घाटन शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि आमदार राज पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले.
रुसाच्या ज्या 22 महाविद्यालयांना स्वायतत्ता मिळाली आहे, त्या महाविद्यालयांमध्ये जय हिंद कॉलेज, मुंबई, सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, रामनरीन रुईया कॉलेज मुंबई, मिठीबाई कॉलेज ऑफ आर्टस, चौहान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ए जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई, डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी ऑफ होम सायन्स मुंबई, हंसराज जीवनदास कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई, एसआयईएस कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स मुंबई, सोफीया कॉलेज ऑफ वूमन मुंबई, चिकीत्सक समूहास सन सीताराम ॲण्ड लेडी शांताबाई पाटकर कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स ॲण्ड व्ही पी वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई, गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स मुंबई, बी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स, ठाणे, रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, रायगड, चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स, रायगड, सिमबॉयसेस कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स, सेनापती बापट, पुणे, सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, तुलजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स बारामती, पुणे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,पंढरपूर, सोलापूर, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, कोल्हापूर या महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील प्रकल्पाचे डिजीटल लाँचिंग यावेळी करण्यात आले.
शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालयांना जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम संशोधन व विकास व नवोपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे. सदर संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायतत्ता प्रदान केलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता योग्य प्रकारे अंमलात आणण्यासाठी भौतिक संरचना व पायाभूत सुविधांकरिता राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम