खुल्या नाट्यगृहांमधील संगीत सभांना मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रभात रागांचे सूर, साथीला सितार - सरोद – बासरी - संतूर - संवादिनी या वाद्यांचे स्वर आणि जोडीला असणा-या ताल वाद्यांच्या साथीने आजची सकाळ अनेक मुंबईकरांसाठी आगळी वेगळी ठरली. यासाठी निमित्त ठरले ते बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभांचे. महापालिकेच्या २९ उद्यानांमध्ये असणा-या खुल्या नाट्यगृहांपैकी काही ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभांना मुंबईकरांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याच्या पुढाकाराने आणि 'बनयान ट्री'  'टेंडर रुट्स अकॅडमी' या संस्थांच्या सहकार्याने आज सकाळी ७ वाजता ते ९ दरम्यान आयोजित संगीत सभांमध्ये ७५ पेक्षा अधिक उदयोन्मुख संगीत साधकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे विविध पैलू उलगडून दाखवित व आपली कला सादर करित उपस्थित रसिकांची मने जिंकून घेतली. या संगीत सभांबाबत मुंबईकरांनी अतिशय उत्साहवर्धक प्रतिक्रिया नोंदविण्यासह यापुढेही असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशा सूचनाही महापालिकेच्या उद्यान खात्याकडे केल्या आहेत, अशी माहिती उद्यान अधिक्षक  जितेंद्र परदेशी यांनी केली आहे.


'मुंबई ग्रीन रागा' या शीर्षकांतर्गत आज आयोजित करण्यात आलेल्या या संगीत कला अविष्करणात गायनासह सारंगी, बासरी, तबला, संवादिनी, सितार, सरोद, संतूर यासारख्या विविध वाद्यांचे वादन देखील करण्यात आले. महापालिकेचे सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिकेच्या १७ उद्यानांमध्ये आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क होते.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २९ उद्यानांमध्ये खुली वर्तुळाकार नाट्यगृहे (Amphitheatre) आहेत, तर अनेक ठिकाणी खुले मंच देखील आहेत. यापैकी १७ उद्यानांमध्ये आज सकाळी ७ वाजता संगीत सभांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या पुढाकाराने आणि 'टेंडर रुट्स अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस'  'बनयान ट्री' या संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या संगीत सभांमध्ये उदयोन्मुख कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादन कला सादर करण्यात आली. या अंतर्गत वाद्य वादनामध्ये प्रामुख्याने सारंगी, बासरी, तबला, संवादिनी, सितार, सरोद, संतुर इत्यादी वाद्यांचा समावेश होता. या १७ ठिकाणांपैकी काही ठिकाणच्या संगीत सभांमध्ये गायनाला प्राधान्य देण्यात येऊन साथीला वाद्य वादन होते. तर काही ठिकाणी वाद्य वादनाला प्राधान्य देण्यात येऊन आणि साथीला गायन होते.


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कलाकारांना त्यांच्या कला सहजपणे सादर करता याव्यात, यासाठी २९ उद्यानांमध्ये वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहेत. या ठिकाणी रसिकांना कलेचा आस्वाद घेण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्था देखील आहे. या आसन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पाय-या असून रसिकांना ऐसपैसरित्या बसता यावे, यासाठी या पाय-यांची रुंदी अधिक ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अनेक उद्यानांमध्ये खुले मंच किंवा चबुतरे देखील आहेत.


महापालिका उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये गायक, वादक, नृत्यसाधक यांना आपल्या कला सादर करता येतील. तथापि, यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक आहे, अशीही माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.


आज सकाळी बृहन्मुंबई महापालिकेच्या ज्या १७ उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये किंवा खुल्या मंचावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यांची नावे व पत्ता पुढीलप्रमाणे:


.क्र.

संगीत सभांचे ठिकाण

1

टाटा उद्यान, ब्रीचकँडी रुग्णालयाजवळ, भुलाभाई देसाई मार्ग

2

जोसेफ बाप्टिस्टा उद्यान, माझगांव

3

आदि शंकराचार्य उद्यान, पोलीस कॉलनी, सर पोचखानवाला मार्ग, वरळी

4

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब केशव ठाकरे मनोरंजन मैदान,

प्रकाश कॉटन मील जवळ, लोअर परेल

5

वीररत्न बाजीप्रभू उद्यान, शिवाजी पार्कजवळ, दादर ()

6

वांद्रे किल्ल्याजवळील उद्यान

7

जॉगर्स पार्क, कार्टर रोड, वांद्रे ()

8

रावसाहेब पटवर्धन उद्यान, लिकिंग रोड, वांद्रे ()

9

लायन्स जुहू मुलांचे पालिका उद्यान, सांताक्रुझ ()

10

वीर सावरकर मनोरंजन मैदान, मालाड ()

11

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम, जोगेश्वरी पूर्व

12

किशोर कुमार बाग, म्हाडा कॉलनी, अंधेरी ()

13

स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, बोरिवली ()

14

ड्रीम पार्क जवळील उद्यान ठाकूर विलेज, कांदिवली (पू)

15

श्री. मारुती मंदिर मैदान, मारुती नगर, दहिसर ()

16

सी. डी. देशमुख उद्यान, मुलुंड

17

कमला नेहरु उद्यान, मलबार हिल


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट