'कोस्टल रोड' लगत होणार मुंबईतील सर्वात मोठा 'समुद्री पदपथ' ; वरळी ते हाजी अली ते 'प्रियदर्शनी पार्क' दरम्यान होणार ६.४ किमीचा पदपथ

सुखाचा प्रवास, मोकळा श्वास' असे घोषवाक्य असणारा आणि नागरिकांसाठी बहु-उपयोगी ठरणारा प्रस्तावित सागरी किनारा रस्त्याचे (कोस्टल रोड) बांधकाम सध्या वेगात सुरु आहे. याच रस्त्यालगत मुंबईतील सर्वात मोठा 'समुद्री पदपथ' (Promenade) देखील आकारास येत आहे. तब्बल २० मीटर रुंद व ६.४ किलोमीटर लांबीचा हा पदपथ समुद्राला जोडून व कोस्टल रोडलगत बांधला जाणार असून तो प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंक दरम्यान असणार आहे. सध्या नेताजी सुभाष मार्गालगत (मरीन ड्राईव्ह) असणारा 'समुद्री पदपथ' हा मुंबईतील सर्वात मोठा 'समुद्री पदपथ' असून त्याची लांबी सुमारे ३.५ किमी एवढी आहे. तथापि, कोस्टल रोड लगत आकारास येणारा हा 'समुद्री पदपथ' जवळपास दुप्पट ६.४ किमी लांबीचा असल्याने तो मुंबईतील सर्वात मोठा 'समुद्री पदपथ' ठरणार आहे, अशी माहिती सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता श्री. मोहन माचीवाल यांनी दिली आहे. 



सागरी किनारा रस्त्यालगत प्रस्तावित करण्यात आलेल्या मुंबईतील सर्वात मोठ्या समुद्री पदपथाची व संबंधित बाबींची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः



  • श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते 'राजीव गांधी सागरी सेतू'च्या (वरळी वांद्रे सी-लिंक) वरळी बाजूपर्यंत ९.९८ किमी लांबीच्या सागरी किनारा रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम सध्या सुरु आहे.

  • ३.४५ किमी लांबीचा सागरी किनारा रस्ता हा बोगद्यातून जाणारा असणार असून सदर बोगदा श्यामलदास गांधी उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क दरम्यान असणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत नवीन विस्तीर्ण समुद्री पदपथ बांधण्यात येणार आहे.

  • प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत ६.४ किमी लांबीचा सलग पदपथ बांधण्यात येणार आहे. या विस्तीर्ण पदपथाची रुंदी ही २० मीटर म्हणजेच सुमारे ६५ फूट एवढी असणार आहे.

  • प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यांतर्गत लोटस ते समुद्री महल दरम्यान सुमारे ४०० मीटर लांबीचा व ४५ मीटर रुंदीचा वैशिष्ट्यपूर्ण पूलही बांधण्यात येणार आहे. या पुलावरील रस्त्यालगत दोन्ही बाजूला ३.५ मीटर रुंदीचे म्हणजेच एकूण ७ मीटर रुंदीचे पदपथ असणार आहेत.

  • वरीलनुसार वरळी वांद्रे सी-लिंकच्या वरळी बाजूपासून प्रियदर्शनी पार्कपर्यंत असणार-या समुद्री पदपथाची एकूण लांबी ही ६.४ किमी एवढी असणार आहे. यापदपथालगत व पदपथांतर्गत सुशोभिकरणाच्या अनुषंगाने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे.

  • सध्या नेताजी सुभाष मार्गालगत असणारा समुद्री पदपथ हा सुमारे ३.५ किमी लांबीचा आहे. ही बाब लक्षात घेतल्यास भविष्यात कोस्टल रोडलगत आकारास येणारा हा समुद्री पदपथ मुंबईतील सर्वात मोठा पदपथ ठरणार आहे.

सागरी किनारा रस्त्यासाठी ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २२ टक्के क्षेत्रात म्हणजेच २१ लाख ५२ हजार ७८० चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७८ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. 'समुद्री पदपथ' देखील याच सुविधांचा भाग असणार आहे. या व्यतिरिक्त या जागेमध्ये १ हजार ६२५ एवढी वाहनक्षमता असणारे ३ भूमीगत वाहनतळ, फुलपाखरु उद्यान, सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह, उद्याने व खेळांची मैदाने, प्रसाधन गृहे इत्यादी बाबी विकसीत करण्यात येणार आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट