लॉकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात २ लाख ५४ हजार गुन्हे २५ कोटी ८ लाख रुपयांची दंड आकारणी. गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५४ हजार गुन्हे दाखल तर २५ कोटी रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते १४ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,५४,९२९ गुन्हे नोंद झाले असून ३४,७४२ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी  २५ कोटी ०८ लाख ७१  हजार ३१४ रु. दंड आकारण्यात आला.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

 या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३५६ घटना घडल्या. त्यात ८९४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर- १ लाख, १३ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,१३,०३२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
       
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१४९ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १८२ पोलीस व २० अधिकारी अशा एकूण २०२ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

नागरिकाचा सहभाग अपेक्षित

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट