
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुणे मेट्रो लाईन-३चे शानदार भूमीपूजन
- by Adarsh Maharashtra
- Dec 18, 2018
- 1345 views
पुणे : पायाभूत सुविधांबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार असल्याने भविष्यात हे शहर जागतिक स्तरावर ओळखले जाईल. मेट्रो देशातील शहरांची “जीवन वाहिनी” बनत असून ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असणार आहे. या नवभारताच्या निर्माणात महाराष्ट्र आणि पुण्याचे मोठे योगदान असेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो लाईन-३चे भूमीपूजन आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, खासदार अनिल शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, पुणे शहराची ओळख सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर अशी असून माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रातही पुण्याने मोठी प्रगती केली आहे. हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञानाचे हब असून या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी देशाला नवी ओळख दिली आहे. या ठिकाणी होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे या ठिकाणी काम करत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. या मेट्रो मार्गामुळे वाहतुकीचा आणि प्रगतीचा वेग वाढणार आहे.
पुण्यातील पहिल्या दोन टप्प्यातील मेट्रोचे काम वेगाने सुरू असून पुढच्यावर्षी १२ किलोमीटरपर्यंत मेट्रो पुण्यात धावेल. पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्राचे आणि राज्याचे विशेष लक्ष आहे. देशातील गावे-शहरे एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे. देशाच्या कोणत्याही भागात फिरताना या कामाचा वेग सहज लक्षात येईल.
विकासाच्या महामार्गापासून कोणीही वंचित राहू इच्छित नाही. त्यासाठी देशभरातील अनेक शहरांतून मेट्रोचे प्रस्ताव केंद्राकडे आले आहेत. देशात ५०० किलोमीटरचे मेट्रोचे काम पूर्ण झाले असून ६५० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मेट्रोची सुरूवात झाली. त्यांच्या काळातच दिल्लीच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले.
गावांपासून शहरांपर्यंत पायाभूत सुविधांवर भर देण्याचे सरकारचे धोरण आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरणाचा पुरस्कार केंद्राने केला असून त्यामाध्यमातून देशातील पहिला मेट्रो प्रकल्प पुण्यात साकारत आहे. या नव्या धोरणामुळे मेट्रोच्या विकासाला गती मिळणार आहे. मेट्रो-रेल्वेचे चांगले धोरण केंद्र सरकारने विकसीत केले असून केंद्राच्या आणि राज्याच्या व्यापक दृष्टीचा हा परिणाम आहे.
“इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ डुईंग” हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगत श्री. मोदी पुढे म्हणाले, पुण्यासह महाराष्ट्रातील ९ शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत १५०० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून ३५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्याच बरोबर देशात स्वच्छता आणि गरिबांना घरे देण्याबाबत मोठे काम सूरू असून रस्ते, वीज आणि पाणी यांच्याशी निगडीत अनेक प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य लोकांना सरकारच्या सेवा वेगाने आणि चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी डिजीटल इंडियाचे काम सुरु आहे. या माध्यमातून देशातील गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जात आहेत. लोकांसाठी सोपे आणि सुलभ नियम बनिवण्याचे सरकारचे धोरण आहे. नवे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यात स्वस्त मोबाईल आणि स्वस्त इंटरनेट डेटाचा मोठा वाटा आहे. जगातला सर्वाधिक मोबाईल बनविणारा दुसरा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या साडेचार वर्षात डिजीटल व्यवहार सहा पटीने वाढले आहेत. यामुळे लोकांच्या रोजच्या गरजा वेगाने पूर्ण होत आहेत. हार्डवेअर बरोबरच स्वस्त इंटरनेट डेटा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात १ लाख एलईडी पदपथ दिवे लावण्याचे काम पूर्ण झाले असून या माध्यमातून मोठी विजेची बचत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याकरिता अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आज होत आहे. हा सर्वांकरिता आनंदाचा क्षण आहे. आयटी हब असलेले हिंजवडी जगाला मानव संसाधन पुरवते. याच ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती केली जाते. हा भाग शिवाजीनगरशी मेट्रोच्या माध्यमातून जोडल्या गेल्यामुळे प्रगतीचे नवे दालन खुले झाले आहे. आयटी पार्कमध्ये लाखो लोक कामाच्या निमित्ताने येतात. प्रवासामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
केंद्राच्या नव्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या या नव्या धोरणानुसार सर्वात पहिला मेट्रोचा प्रकल्प पुण्यात होत आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. तसेच वेळेचे बचत होऊन गतिमानता आणि कार्यक्षमता वाढून देशाचा विकास होईल. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील तसेच देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुणे नावलौकिक मिळवेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण (पीएमआरडीए)चे क्षेत्र महाराष्ट्रातील विकासाचे क्षेत्र होईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागात सुरु करण्यात येणाऱ्या रिंग रोड, हायटेक सिटी, इलेक्ट्रिक बसेस आदी प्रकल्पांचा उल्लेख केला. पीएमआरडीएच्या माध्यमातून तसेच लोकांच्या सहकार्यातून या भागाचा सुनियोजित विकास साधण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, पुणे शहराबरोबर माझा जवळचा संबंध राहिला आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातले सर्वात प्रगतशील शहर म्हणून पुण्याचा विकास होत आहे. पुणे ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहे. स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले सुरू आहे.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, कमी कालावधीत पुण्यात मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. पुणे मेट्रो लाईन-३ मुळे हिंजवडीच्या आयटी पार्क मधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनां मोठा लाभ होणार आहे. या मेट्रोच्या कामामुळे प्रवासाला गती मिळणार आहे. हिंजवडी मेट्रोचा विस्तार वाढत राहणार असून शिवाजीनगर पर्यंतची ही मेट्रो हडपसर पर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. पुण्याच्या विकासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी पुणे शहरासाठी आला आहे. स्मार्ट सिटी, जायका, मेट्रो यांसारखे मोठे प्रकल्पाबरोबर १६ हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्गाची कामे होणार आहेत. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबरोबच पुरंदर येथील विमानतळाच्या कामालाही गती मिळत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम